२० दिवसांपासून अॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:16 IST2018-02-12T22:13:48+5:302018-02-12T22:16:25+5:30
श्वान चावल्यानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये गेल्या २० दिवसांपासून ही लस नाही. परिणामी, गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. पदरमोड करून त्यांना ही लस विकत घ्यावी लागत आहे.

२० दिवसांपासून अॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्वान चावल्यानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये गेल्या २० दिवसांपासून ही लस नाही. परिणामी, गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. पदरमोड करून त्यांना ही लस विकत घ्यावी लागत आहे.
श्वानदंशामुळे दरवर्षी साधारण २० हजार लोकांचा ‘रॅबिज’मुळे मृत्यू होतो. यात १५ वर्षे वयोगटाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. लस न टोचलेली कुत्री मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने होतो. विशेष म्हणजे, श्वान चावल्यानंतर देण्यात येणारी लसीची किंमत गरिबांना परवडणारी नाही. यातही केवळ बीपीएलच्या रुग्णांनाच ही लस उपलब्ध करून देण्याचे मेयो, मेडिकलचे अजब धोरण आहे. मेयो व मेडिकलमध्ये आठवडाभरात सुमारे ७० ते ८० वर अॅन्टीरेबिज लसीची गरज भासते. महिन्याची सरासरी काढली तर मेडिकलला दरमहा ५०० अॅन्टीरेबिज लसी लागतात. ही लस ‘इंडियन इम्युनॉलॉजिकल’कडूनच मिळते. मात्र मागणीच्या तुलनेत फार कमी साठा पुरवठादाराकडून मिळतो. सध्या तरी या दोन्ही रुग्णालयात ही लस नाही. यामुळे आता ‘बीपीएल’ रुग्णांसह सामान्य रुग्णही अडचणीत आले आहेत.
‘हाफकिन’कडून लसीची प्रतीक्षा
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दरकरारावरील औषधे विकत घेण्याचा नियम होता. परंतु ३१ जानेवारीला या दरकराराची मुदतवाढ संपली, तर आता औषधे खरेदीची जबाबदारी ‘हाफकिन कॉर्पाेरेशन’कडे देण्यात आली आहे. परंतु या हाफकिनकडून अद्यापही अॅन्टीरेबिज लसीसह इतरही आवश्यक औषधे उपलब्ध झाली नाहीत. यामुळे दोन्ही रुग्णालयात औषधांना घेऊन विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
मनपाकडूनही रुग्णांची बोळवण
शहरातील गल्लीबोळात कुत्र्यांचा त्रास कमी झालेला नाही. श्वान चावण्याच्या घटना वाढतच आहेत. मेयो, मेडिकलमध्ये ही लस नसल्याने रुग्णांना महापालिकेच्या इस्पितळांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे. मनपाच्या सदर आणि महाल येथील इस्पितळांमध्ये अॅन्टीरेबिजची लस उपलब्ध आहे. परंतु रविवार व इतर सुटींच्या दिवशी ही दोन्ही इस्पितळे बंद राहत असल्याने रुग्णांची बोळवण होते. इतर दिवशीही ठराविक वेळेतच ही लस मिळते. यामुळे गरिबांनी करावे काय, हा प्रश्न विचारल्या जात आहे.