हल्ला करणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By Admin | Updated: September 25, 2016 03:16 IST2016-09-25T03:16:17+5:302016-09-25T03:16:17+5:30
एका खून खटल्यातून निर्दोष ठरल्यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपिलात जाऊ नये म्हणून एकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी

हल्ला करणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला
नागपूर : एका खून खटल्यातून निर्दोष ठरल्यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपिलात जाऊ नये म्हणून एकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. खुनी हल्ल्याचे हे प्रकरण कामठी येथील आहे. बबलू कुरेशी इक्बाल अहमद कुरेशी, असे आरोपीचे तर शेख सलीम शेख शब्बीर (२७) रा. मच्छिपूल शास्त्री चौक कामठी, असे जखमीचे नाव आहे.
प्रकरण असे की, काही वर्षांपूर्वी शेख सलीम याचा भाऊ इम्रान याचा फुलओळी चौक कामठी येथील रहिवासी शेख समीर ऊर्फ कव्वा रफिक अहमद (३१) याने खून केला होता. सत्र न्यायालयात खटला चालून कव्वा याची निर्दोष सुटका करण्यात आली होती.
निर्दोष सुटकेविरुद्ध मृत इम्रान याचा भाऊ शेख सलीम याने उच्च न्यायालयात अपील करू नये म्हणून ४ सप्टेंबर २०१६ रोजी रात्री ११.३० वाजंताच्या सुमारास नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळमना टी पॉर्इंटवर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपींनी शेख सलीम याला रोखले. त्यावेळी शेख सलीम हा कामावरून आपल्या घराकडे परतत होता. आरोपींपैकी बबलू कुरेशी याने ‘मारो इसको’ असे म्हटले होते. त्याच वेळी मुजबील आणि जफर यांनी सलीमला पकडून समीर ऊर्फ कव्वा याने ठार मारण्याच्या हेतूने हातबुक्क्या आणि लोखंडी सब्बलने हल्ला केला होता.
सलीमचा उजवा पाय फ्रॅक्चर करून त्याला गंभीररीत्या जखमी केले होते. जुना कामठी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता मिश्रा यांनी वैद्यकीय अहवाल आणि जखमी सलीमच्या बयाणावरून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी ५ सप्टेंबर २०१६ रोजी शेख समीर ऊर्फ कव्वा आणि मुजबील हुसेन मुज्जफर हुसेन (२४) रा. हैदरी चौक यांना अटक केली होती. बबलू कुरेशी आणि जफर बाडेवाला हे फरार आहेत.
गुन्ह्यात वापरलेली कार बबलू कुरेशी याची आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता प्रकरण गंभीर असल्याने तसेच तो गुन्हा करण्याच्या सवयीचा असल्याने आणि आरोपीची पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)