ंदुसऱ्या पत्नीच्या अपत्याला अनुकंपावर नोकरी नाही
By Admin | Updated: August 5, 2015 02:51 IST2015-08-05T02:51:13+5:302015-08-05T02:51:13+5:30
रेल्वे कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीच्या अपत्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकत नाही असा निर्णय....

ंदुसऱ्या पत्नीच्या अपत्याला अनुकंपावर नोकरी नाही
हायकोर्ट : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द
नागपूर : रेल्वे कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीच्या अपत्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.१६ जानेवारी २०१४ रोजी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने मध्य रेल्वे कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांनी रेल्वेची याचिका मंजूर करून न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द केला आहे. दुसऱ्या पत्नीच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते हे दाखविणारी कोणतीही कागदपत्रे संबंधित मुलाकडून सादर करण्यात आलेली नाहीत. तसेच, मुलाने नोकरीसाठी अर्ज देण्यासही विलंब केला. कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आधार देणे हा अनुकंपा नोकरीचा उद्देश आहे. अर्ज करण्यास झालेल्या विलंबामुळे हा उद्देशच निरुपयोगी ठरलाय असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या निर्णयात नोंदविण्यात आले आहे.
प्रदीप उत्तम गिड असे मुलाचे नाव असून ते तोंडगाव (वाशीम) येथील रहिवासी आहेत. प्रदीपच्या वडिलाचे ६ फेब्रुवारी १९९९ रोजी निधन झाले. त्यावेळी प्रदीप अल्पवयीन होता. तो २२ आॅक्टोबर २००३ रोजी सज्ञान झाला. यानंतर त्याने २०११ मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. मध्य रेल्वेने २६ सप्टेंबर २०११ रोजी अर्ज फेटाळून लावला होता. याविरुद्ध प्रदीपने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मंजूर करण्यात आला होता. मध्य रेल्वेतर्फे अॅड. एन. पी लांबट तर, गिडतर्फे अॅड. ए.एम. कुकडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)