आणखी एक ‘माझी’मेडिकलचा करंटेपणा : आजारी मुलाला
By Admin | Updated: October 26, 2016 02:58 IST2016-10-26T02:58:01+5:302016-10-26T02:58:01+5:30
पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालत जाणारा एक पती... अन् सोबत आईच्या मृत्यूने कळवळणारी त्यांची लहान मुलगी...

आणखी एक ‘माझी’मेडिकलचा करंटेपणा : आजारी मुलाला
पाठीवर बसवून केला सहा कि. मी.चा प्रवास
सुमेध वाघमारे नागपूर
पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालत जाणारा एक पती... अन् सोबत आईच्या मृत्यूने कळवळणारी त्यांची लहान मुलगी... असे धक्कादायक चित्र ओडिशातील कालाहंडी येथे नुकतेच दिसले. या वृत्ताने समाजमन हळहळले. शासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले गेले.
मात्र शासकीय रुग्णालयांतील उपाययोजनांमध्ये बदल झाले नाहीत. मंगळवारी दाना माझी सारखाच एका बापाला मेडिकलने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. आॅटोला पैसे नसल्याने किडनीचा आजार असलेल्या पोटच्या गोळ्याला पाठीवर बसविले. एका साध्या तपासणीसाठी मेडिकल ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि परत अशी सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली.
कालाहंडी येथील दाना माझीची ती घटना २५ आॅगस्टची होती. आज मंगळवारची तारीख २५ आहे. केवळ महिना बदललेला आहे. मात्र घटना माझी सारखीच आहे. गडचिरोली येथे राहणारे मेरसू बारसागडे यांच्या घरची परिस्थिती बेताची.
नेहमी हसत खेळत राहणारा त्यांचा आठ वर्षीय मुलगा आनंदला पोटात काही दिवसांपासून दुखत होते. गावातील डॉक्टरांना दाखविल्यावर त्यांनी नागपूरच्या मेडिकलमध्ये नेण्यास सांगितले. मुलाला भयंकर आजार झाला या विचारानेच हे कुटुंब हादरले. पैशांची जुळवाजुळव करून मेडिकल गाठले. डॉक्टरांनी आनंदला वॉर्ड क्र. ६ मध्ये भरती केले. किडनीचा आजार असल्याचे निदान झाले. हृदयविकाराचीही समस्याही समोर आली. त्याच्या तपासणीसाठी डॉक्टरांनी तीन किलोमीटर अंतरावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागात ‘इको’ करण्यास सांगितले. हातात तशी चिठ्ठी दिली. परंतु रुग्णवाहिका दिली नाही. या कुटुंबासाठी नागपूर नवीन.
रुग्णालयाबाहेर आल्यावर सुपर हॉस्पिटल कुठे आहे, हा प्रश्न पडला. आॅटोचालकाने ७० रुपये भाडे सांगितले. एवढे पैसे खर्च करणे परवडणारे नव्हते. म्हणून रस्ता विचारला. हाताला ‘इंट्राकॅथ’ लागलेल्या आनंदला पाठीवर बसविले आणि तीन किलोमीटरची पायपीट सुरू झाली.
पाठीवर बसून आनंदच्या पोटात दुखत होते. त्याच्या मागून चालत असलेली त्याची आई धीर देत होती. हॉस्पिटलला पोहचल्यावर दोन तासांनी ‘इको’ झाला. मात्र तेथूनही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. ती नि:शुल्क उपलब्ध असते याची कुणी माहितीही दिली नाही. यामुळे आनंदला पाठीवर बसविले. आणि पुन्हा पायपीट सुरू झाली.
मेरसू बारसागडेसारखे अनेक विवश बाप या मार्गावर रोजच दिसतात. परंतू दोन्ही रुग्णालयासाठी या नेहमीच्या घटना झाल्याचे वास्तव आहे.