नागपूर : उपराजधानीत हत्यांचे सत्र सुरूच असून, गुरुवारी आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आली. गंगाबाई घाट ते जगनाडे चौक या मार्गावर वर्दळीच्या वेळी घटना घडली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. एकीकडे पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेत ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन राबविले व दुसरीकडे शहरात हत्येची घटना घडल्याने पोलिसांची कार्यप्रणाली भरकटत चालली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
नितेश दुपारी (३८, गुजरवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गंगाबाई घाटजवळ भर रस्त्यावर त्याची हत्या करण्यात आली. त्याचा काही दिवसांअगोदर काही तरुणांशी वाद झाला होता. त्या वादातूनच यश ऊर्फ दत्तू गोस्वामी व त्याच्या साथीदाराने त्याला गुरुवारी सायंकाळी घेरले व फुटपाथवरच त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली. काही वेळातच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व पंचनामा सुरू केला. उपायुक्त महक स्वामी यादेखील घटनास्थळी पोहोचल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चाकूचे वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
छायाचित्रकारांना मज्जावदरम्यान, या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर छायाचित्रकारांना छायाचित्रे घेण्यास मज्जाव केला होता. घटनास्थळाचे फोटो काढण्याची काहीच आवश्यकता नाही, असे अधिकाऱ्यांनी छायाचित्रकारांना म्हटले.पोलिसांची परत हलगर्जी ?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी नितेश व यशमध्ये बुधवारी रात्रीदेखील वाद झाला होता. कोतवाली पोलिस ठाण्यापर्यंत ही माहिती गेली होती. मात्र पोलिसांनी हा वाद जास्त गंभीरतेने घेतला नाही. त्यातूनच यशने नितेशला रस्त्यात गाठले व चाकूने वार केले.