नासुप्रमध्ये आणखी एक नगररचना संचालक कशासाठी?
By Admin | Updated: May 28, 2015 02:28 IST2015-05-28T02:28:10+5:302015-05-28T02:28:10+5:30
नागपूर सुधार प्रन्यासमध्ये आणखी एका नगररचना संचालकपदाची निर्मिती केली जाणार आहे.

नासुप्रमध्ये आणखी एक नगररचना संचालक कशासाठी?
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासमध्ये आणखी एका नगररचना संचालकपदाची निर्मिती केली जाणार आहे. या संबंधीचा विषय आज, गुरुवारी नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र, विश्वस्तांच्या या प्रस्तावाला विरोध आहे. शहरातील जवळपास सर्वच ले-आऊट महापालिकेकडे हस्तांतरित झाले असताना आणखी एक नगररचना संचालक कशासाठी, असा सवाल विश्वस्तांनी उपस्थित केला आहे. या मुद्यावर बैठकीत विश्वस्त विरुद्ध प्रशासन असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेले बहुतांश ले-आऊट महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. शहरातील काही अनधिकृत वस्त्यांचे नियमितीकरण सोडल्यास सर्वच कामे संपली आहेत. ब्रिटिश काळात टाऊन प्लॅनिंगसाठी सुधार प्रन्यासची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी शहरातील ५२ योजना प्रन्यासकडे होत्या. तेव्हापासून एकच नगररचना उपसंचालकाचे पद आहे. यापैकी ४५ योजना प्रन्यासने पूर्ण केल्या आहेत. आता फक्त सात स्ट्रीट स्कीम एवढ्याच योजना प्रन्यासकडे आहेत. याशिवाय आता नासुप्रवर आता मेट्रो रिजनचा विकास व नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही सर्व कामे प्रन्यासतर्फे खासगी कन्सल्टंट यांच्या माध्यमातून केली जात आहेत. विशेष म्हणजे याकरिता नगररचना उपसंचालकपद आधीच मंजूर आहे. सुजाता कडू सध्या या पदावर कार्यरत आहेत. नुकतेच राज्य सरकारने महापालिकेलाही नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. शहरातील योजनांचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असताना आता नासुप्रमध्ये नगररचना संचालकाचे आणखी एक पद निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नासुप्रच्या अभियंत्यांनीही हा विषय आपल्या समजण्यापलिकडील असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)