विद्यापीठाचा आणखी एक प्रताप
By Admin | Updated: July 22, 2015 03:26 IST2015-07-22T03:26:06+5:302015-07-22T03:26:06+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे ‘अ’ दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात येथील भोंगळ कारभार काही थांबलेला नाही.

विद्यापीठाचा आणखी एक प्रताप
पदवीत ‘आर्किआॅलॉजी’चे केले ‘आर्किटेक्चर’ : २०१२ मधील सर्व पदव्या परत बोलविल्या
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे ‘अ’ दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात येथील भोंगळ कारभार काही थांबलेला नाही. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाकडे पाठविण्यात आलेल्या पदव्यांमध्ये ‘आर्किआॅलॉजी’ ऐवजी चक्क ‘आर्किटेक्चर’ असे नमूद करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ही चूक लक्षात येताच विद्यापीठाने या सर्व पदव्या परत बोलाविल्या आहेत.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना २०११ पासूनच्या पदव्या मिळाल्या नव्हत्या. अखेर प्रसारमाध्यामांतून ही बाब समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने यावर पावले उचलली व कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पदवी प्रमाणपत्र लवकरात लवकर छापून विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतील याला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. याकरिता विद्यापीठाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवादेखील घेतली.
२०१२ सालच्या पदवी छापून आल्या व त्या संबंधित महाविद्यालये व विद्यापीठातील विभागांना पाठविण्यात आल्या.
विद्यापीठातील इतर विभागांप्रमाणे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाकडे पदवी येणे अपेक्षित होते. परंतु तुलनेने कमी विद्यार्थी असल्याने येथील पदवी प्रमाणपत्रे उशिरा पाठविण्यात आली. यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून विविध कारणे देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता पदवी प्रमाणपत्र नंतर छापण्यात आली असे उत्तर एका अधिकाऱ्याने दिले. दरम्यान, उशिरा आलेल्या पदवीचा गठ्ठा विभागाकडे पोहोचविण्यात आला. ज्यावेळी विद्यार्थी पदवी घेण्यासाठी आले तेव्हा संबंधित मोठी चूक विभागातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. या पदवीवर ‘आर्किआॅलॉजी’ऐवजी चक्क ‘आर्किटेक्चर’ असे छापण्यात आले होते. इतर पदव्या तपासल्या असता २०१२ च्या सर्वच पदवीवर सारखी चूक दिसून आली. परीक्षा विभागाला ही बाब कळताच लागलीच सर्व पदवी परत बोलविण्यात आल्या. आता १५ ते २० दिवसांनंतर सुधारित पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येतील अशी माहिती परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली आहे.