आणखी २५० काेंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:33+5:302021-01-17T04:08:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर/धापेवाडा : सावळी (खुर्द) (ता. कळमेश्वर) शिवारातील शेतात २५० मृत काेंबड्या उघड्यावर फेकल्याचे शनिवारी (दि. १६) ...

आणखी २५० काेंबड्यांचा मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर/धापेवाडा : सावळी (खुर्द) (ता. कळमेश्वर) शिवारातील शेतात २५० मृत काेंबड्या उघड्यावर फेकल्याचे शनिवारी (दि. १६) सकाळी तसेच माेहपा (ता. कळमेश्वर) शिवारातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रात मृत काेंबड्या फेकल्याचे शुक्रवारी (दि. १५) सकाळी निदर्शनास आले. नदीतील मृत काेंबड्या चार ते पाच दिवसांपूर्वी फेकल्या असाव्या, असा अंदाज पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या वाहनाद्वारे येथे आणून फेकल्याची शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील पाेल्ट्री फार्ममध्ये दाेन दिवसांत १३० काेंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समाेर आले आहे.
आठवडाभरापूर्वी उबगी (ता. कळमेश्वर) येथील पाेल्ट्री फार्ममधील २५० काेंबड्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाला नाही, असा प्रयाेगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे त्या काेंबड्यांचा मृत्यू डिजेच्या आवाजामुळे घाबरल्याने तसेच चेंगरून गुदमरल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्यानंतर माेहपा शिवारातील चंद्रभागा नदीच्या पात्रात मृत काेंबड्या आढळून आल्या. त्या मृत काेंबड्या नेमक्या कुणी फेकल्या, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही.
माहिती मिळताच लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या सहायक आयुक्त डाॅ. जयश्री भूगावकर, पशुधन विकास अधिकारी डाॅ. व्ही. एस. घनबहाद्दुर,पशुधन पर्यवेक्षक एस. एस. पुरी, गजानन गौरकर, विलास राऊत यांनी नदीतील मृत काेंबड्यांची पाहणी केली. त्यांना पात्रात ४० ते ५० मृत काेंबड्या आढळून आल्या. त्या चार-पाच दिवसांपूर्वी फेकल्या असाव्या, अशी शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या अधिकाऱ्यांनी लगेच परिसरातील पाेल्ट्री फार्मची पाहणी केली. मृत काेंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती डाॅ. जयश्री भूगावकर यांनी दिली.
....
नमुने प्रयाेगशाळेत
धापेवाडा शिवारात सुरेंद्र पाल यांचा पाेल्ट्री फार्म असून, त्यांच्या फार्ममध्ये गुरुवारी (दि. १४) ८५ व शुक्रवारी (दि. १५) ४५ अशा १३० काेंबड्यांचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाच्या चमुने शुक्रवारी या फार्मची प्रत्यक्ष पाहणी केली आणि मृत काेंबड्यांचे नमुने घेतले. ते पुणे शहरातील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त डाॅ. जयश्री भूगावकर यांनी दिली. प्रयाेगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काेंबड्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट हाेईल. मृत काेंबड्या कुठेही न फेकता त्यांची याेग्य विल्हेवाट लावावी, असेही डाॅ. जयश्री भूगावकर यांनी सांगितले.
...
मृत्यूचे कारण अस्पष्ट
सावळी (खुर्द) शिवारातील ईसा माेहम्मद वली यांच्या शेतातील पाेल्ट्री फार्म विनाेद लाेखंडे व संजय चैकीकर यांची चालवायला घेतला आहे. त्यांच्या फार्ममध्ये सहा हजार पक्षी आहेत. यातील २५० काेंबड्यांचा मृत्यू झाला असून, त्या विल्हेवाट लावण्यासाठी जवळच्या शेतात उघड्यावर फेकल्या. शेजारी प्लास्टिकच्या बॅग पडल्या हाेत्या. या मृत काेंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.