नागपूर : अलीकडेच घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्याच्या घोषणेमुळे व्याघ्र भ्रमणमार्गाच्या सुरक्षेसंदर्भातील आशा बळावल्या आहेत. यासोबतच राज्यात नव्याने १० राखीव संवर्धन वनक्षेत्र जाहीर झाले आहेत. यामुळे राज्यातील आणि राज्य सीमामधून जाणारे टिपेश्वर अभयारण्य, तेलंगणातील कावल अभयारण्य, छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प हे भ्रमणमार्ग सुरक्षित होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाघांचे भ्रमणमार्ग हा विषय आधीपासूनच वन्यजीवप्रेमींमध्ये चर्चेचा आहे. मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्य, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य या सर्व वनांना जोडणारे व्याघ्र भ्रमणमार्ग संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वाघ हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, हे यापूर्वीच्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. कन्हारगाव अभयारण्य हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडे असून महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमांमधील जंगलांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल ठरणार आहे. कन्हारगाव अभयारण्याच्या पश्चिमेकडे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य असा भ्रमणमार्ग आहे, तर तेलंगणा राज्यातील कावल अभयारण्य असा भ्रमणमार्गसुद्धा आहे. कन्हारगावच्या दक्षिणेकडील छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प असासुद्धा महत्त्वपूर्ण भ्रमणमार्ग आहे. या नव्या अभयारण्यामुळे यवतमाळ, कारंजा, अकोला-बुलडाणा जिल्ह्यातील जंगलामार्गे अजिंठा ते गौताळा अभयारण्यापर्यंत वाघांचा प्रवास होऊ शकेल. तसेच ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघ आदिलाबादकडून माहूर, पुसद मार्गे हिंगोली जिल्ह्यातून पुढे जाऊ शकतील व पैनगंगा अभयारण्य मराठवाड्याला लागून असल्याने वाघांचा संचार विनाअडथळ्याने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यास मान्यता मिळाली होती. याच बैठकीत कोल्हापूर ते कर्नाटकपर्यंतचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी पश्चिम घाटात आठ तर विदर्भात दोन अशी १० राखीव संवर्धन वनक्षेत्राची घोषणाही शासनाने याच बैठकीत केली होती.
...
राज्यात विदर्भात सर्वाधिक वाघ
राज्यात असलेल्या ३१२ वाघांपैकी जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. वाघांची संख्या वाढल्याने त्यांचे भ्रमणमार्ग विस्तारण्याची गरज आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या मार्गावरील अडथळे दूर करण्यासोबतच नव्या मार्गांसाठी वाव मिळवून देणेही वनविभागापुढील महत्त्वाची जबाबदारी आहे. नवे अभयारण्य आणि घोषित झालेल्या राखीव संवर्धन वनक्षेत्रामुळे ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे.
...कोट
वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे, हा यामागील हेतू आहे. मागील १०-१२ वर्षांपासून सातत्याने याकडे लक्ष वेधले जात होते. मुख्यमंत्र्यांंनी पुढाकार घेऊन यात लक्ष घातल्याने हे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे वाघांच्या भ्रमणमार्गाचे संरक्षण होईल.
- यादवराव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ
...