बोंडअळी नुकसानग्रस्तांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करणार; सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:47 IST2017-12-19T17:46:54+5:302017-12-19T17:47:25+5:30
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी व फलोत्पादन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी विधान परिषदेत नियम २६० अन्वयेच्या प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली.

बोंडअळी नुकसानग्रस्तांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करणार; सदाभाऊ खोत
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी व फलोत्पादन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी विधान परिषदेत नियम २६० अन्वयेच्या प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली.
नुकसानसंदर्भात राज्यातील ७ लाख २१ हजार शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. १५ डिसेंबरपर्यंत ७ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकाचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. केंद्रीय कापूस संधोधन केंद्राने बीटी कॉटन बियाण्यांची बोंडअळी प्रतिकारक्षमता कमी झाल्याची माहिती दिली होती, परंतु यावर पर्याय सुचविण्यात आला नव्हता. बीटी बियाण्यांवर अकोला कृषी विद्यापीठात संशोधनाचे काम सुरू आहे. लवकरच बीटी कापसाला पर्यायी बियाणे शोधले जाईल, असा विश्वास खोत यांनी व्यक्त केला.
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत्यू झालेल्यांना प्रत्येकी दोन लाखांची मदत शासनाकडून करण्यात आली आहे. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री व खा. शरद पवार यांची याच विषयावर चार दिवसांपूर्वी बैठक झाली. विमा दाव्यांची राष्ट्रीय ग्राहक सुरक्षा समितीकडे तक्रार करण्यात आली असून, लोम्बार्ड विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.