‘अन्नामृत’ भागवत आहे इस्पितळांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:30+5:302021-02-07T04:09:30+5:30
- साडेसात हजार शालेय विद्यार्थ्यांसोबत ग्रीन किचन सेवेचा विस्तार धीरज शुक्ला / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कळमना येथे ...

‘अन्नामृत’ भागवत आहे इस्पितळांची भूक
- साडेसात हजार शालेय विद्यार्थ्यांसोबत ग्रीन किचन सेवेचा विस्तार
धीरज शुक्ला / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना येथे साकारलेल्या विदर्भातील सर्वांत मोठ्या ग्रीन किचनमधून केवळ शालेय विद्यार्थीच नव्हे, तर रुग्णांच्या नातेवाइकांचीही भूक भागविली जात आहे. इस्कॉनअंतर्गत अन्नामृत फाउंडेशनद्वारे दररोज जवळपास दोन हजार नागरिकांचे पोट भरले जात आहे. ही सेवा सद्य:स्थितीत मेडिकल कॉलेज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पुरविली जात आहे. दात्यांच्या मदतीने मानवसेवेचा हा उपक्रम सुरू असल्याचे अन्नामृत प्रकल्पाचे संचालक व चेअरमन श्यामसुंदर शर्मा यांनी सांगितले.
जवळपास १० हजार चौरस फूट जागेवर ग्रीन किचनचे पहिले चरण डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण झाले होते; परंतु पूर्ण क्षमतेने भोजन तयार केले जात नव्हते. सद्य:स्थितीत जिल्हा परिषद कामठी, महादुला व कोराडी येथील शाळेतील साडेसात हजार मुलांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. पहिल्या चरणातील क्षमता जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांची होती; परंतु फाउंडेशनने या सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. २.३० कोटी रुपये खर्चातून एक लाख मुलांसाठी दररोज भोजनाची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या चरणात एक एकर जमिनीवर जवळपास पाच कोटी रुपये खर्चातून किचन तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर दररोज दोन लाख मुलांच्या भोजनाची व्यवस्था शक्य होईल.
४.५० लाख लोकांना भोजन
ग्रीन किचनच्या माध्यमातून मनपाच्या निर्देशानुसार आतापर्यंत ४.५० लाख लोकांना भोजन सेवा प्रदान करण्यात आली. चार महिने सातत्याने ही सेवा सुरू होती. दात्यांकडून मदत सुरू आहे.
भंडारापर्यंत होईल सेवेचा विस्तार
आगामी काळात ग्रीन किचन सेवेचा विस्तार भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधी जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंत होईल. यासंदर्भात भंडारा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला जात आहे. लवकरच परवानगी प्राप्त होईल. फाउंडेशन तुमसर येथील दोन हजार मुलांना जेवण पुरविण्याच्या तयारीत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
अशा तऱ्हेने होते जेवणाची तयारी
अन्न शिजविण्यासाठी अत्याधुनिक मशिन्सचा उपयोग होतो. स्टेनलेस स्टिलने बनलेल्या मशिन्समधून शुद्धतेने अन्न तयार होते. सगळ्याच मशिन्स ऑटोमेशन यंत्रणेद्वारे काम करतात. १० स्वयंपाकी रात्री ३ वाजेपासून सेवेत सज्ज असतात. सकाळी ७.३० वाजता पहिली गाडी जेवण घेऊन सोडली जाते. जेवण ठेवण्यासाठी जवळपास दोन हजार कंटेनर आहेत. या कंटेनरमध्ये पाच तासांपर्यंत अन्न ताजे राहते. दुपारी ३ वाजता हे काम आटोपले जाते. त्यानंतर भांडी स्वच्छ करणे व स्ट्रलाईज करण्याची प्रक्रिया सुरू होते. कच्च्या भाज्यांना स्वच्छ करणे आणि त्यांना मशीनद्वारे कापण्याचे कार्य केले जाते.
सुरक्षा व स्वच्छतेची घेतली जाते काळजी
ग्रीन किचनमध्ये सुरक्षाकर्मी तैनात आहेत. परवानगीनेच येथे प्रवेश दिला जातो. कॅप, ग्लोव्हज्, मास्क घातल्यावर आणि चपला-जोडे बाहेर काढल्यावरच प्रवेश मिळतो. १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. ग्रीन किचनच्या कार्यालयाशिवाय संचालक श्यामसुंदर शर्मा, राजेंद्रन रमन, भागीरथ दास व प्रवीण साहनी यांना या यंत्रणेशी मोबाइलद्वारे जोडण्यात आले आहे.
..........