प्राणी, पक्षी विमानतळापासून दूर
By Admin | Updated: August 26, 2016 02:57 IST2016-08-26T02:57:03+5:302016-08-26T02:57:03+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्राणी आणि पक्ष्यांना दूर ठेवणारी विशेष यंत्रणा लवकरच बसविण्यात येणार आहे.

प्राणी, पक्षी विमानतळापासून दूर
विशेष यंत्रणेची उभारणी होणार : देशातील १० धावपट्ट्यांवर यंत्रणा
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्राणी आणि पक्ष्यांना दूर ठेवणारी विशेष यंत्रणा लवकरच बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आता धावपट्टीवर प्राणी आणि पक्ष्यांचा वावर दिसणार नाही.
‘बायो इकॉस्टिक बर्ड अॅण्ड अॅनिमल डिटरेंट सिस्टम’ असे विशेष यंत्रणेचे नाव आहे. ही यंत्रणा विमानतळावर प्राणी येण्याच्या मार्गावर बसविण्यात येणार आहे. देशातील १० विमानतळावर ही यंत्रणा लावण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम पाहूनच मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) यंत्रणेला नागपूर विमानतळावर बसविण्याचा निर्णय घेतला. विमानाचे ‘लँडिंग आणि टेकआॅफ’वेळी या उपकरणातून निघणाऱ्या आवाजाने प्राणी आणि पक्षी भयभीत होऊन विमानतळाच्या जवळपास फिरकणार नाहीत.
गेल्यावर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विमान उतरत असताना डुकरे धावपट्टीवर आली होती, हे उल्लेखनीय. या घटनेची तक्रार वैमानिकांनी वायुसेना आणि एटीसीकडे केली होती. वायुसेनेच्या भिंतीच्या फटीतून प्राणी धावपट्टीवर येत असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. वायुसेनेची जमीन मिहानला हस्तांतरित करताना सुरक्षा भिंतीकडे लक्ष दिले नाही. (प्रतिनिधी)
डीजीसीएच्या अधिकाऱ्यांतर्फे पाहणी
राष्ट्रपतींच्या विमानासमोर डुकरे आल्याच्या घटनेनंतर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी नागपूर विमानतळाची पाहणी करून व्यवस्थापनाला आवश्यक निर्देश दिले होते. यापूर्वी लोकमतने विशेष वृत्ताद्वारे विमानतळाची तुटलेली सुरक्षा भिंत आणि आवश्यक पैलूवर प्रकाश टाकला होता. त्यानंतर सुरक्षेशी संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्यात आली. गेल्या सहा महिन्यात विमानतळावर प्राणी वा पक्षी दिसून आलेले नाहीत. विमानतळाच्या कार्यान्वित परिसरात गवत नियमितपणे कापले जात आहे.
नवीन यंत्रणा प्रभावी
विमानतळावर बसविण्यात येणारी विशेष यंत्रणा प्रभावी आहे. त्यातून निघणाऱ्या आवाजामुळे प्राणी आणि पक्षी दूर राहतील. यंत्रणा बसविण्यासाठी २५ लाख रुपये खर्च होणार आहे. धावपट्टीच्या बाजूला सोलर फेन्सिंग सुरक्षेचे काम करेल.
-लक्ष्मीनारायण, वरिष्ठ व्यवस्थापक,
विमानतळ सुरक्षा विभाग.