नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: ३३ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप निर्माण करणारे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आले. परिणामी, संतप्त झालेल्या भुजबळांनी स्वपक्षाच्या सत्काराकडे पाठ दाखविली. या घडामोडीमुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून, नागपूरच्या बोचऱ्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी पार पडला. त्याच्या काही तासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार निवासासमोरच्या देशपांडे सभागृहात पक्षाचा मेळावा आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा ठेवला होता. एकीकडे शपथविधी सोहळ्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून महायुतीच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेतेही मोठ्या संख्येत सत्कार समारंभाला जमले होते. या दोन्ही कार्यक्रमांत पुढच्या काही तासांत मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याचीही चर्चा होती. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी या संबंधाने चुप्पी साधली असली तरी ज्यांना मंत्रिपद द्यायचे, त्यांना निरोप गेले होते. अशात पक्षातील ज्येष्ठ-कनिष्ठ सहकाऱ्यांना निरोप मिळूनही मंत्रिपदाबाबत भुजबळ यांना कसलाही निरोप नसल्याने सकाळपासून संबंधितांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली होती.
डावलल्याची बाब लागली जिव्हारी
मंत्रिपदापासून डावलले गेल्यामुळे छगन भुजबळ कमालीचे संतप्त झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. ‘साहेब’ येणार आणि ते या मेळाव्यात आपली भडास काढणार, असे काही भुजबळ समर्थक कुजबुजत होते. तर, मेळाव्यास उपस्थित राहण्यास भुजबळांनी नकार कळविल्याचेही काही जण सांगत होते.