अंगणवाडी सेविका उतरल्या रस्त्यावर
By Admin | Updated: March 21, 2017 01:49 IST2017-03-21T01:49:09+5:302017-03-21T01:49:09+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसंदर्भात शासनाने नेमलेल्या समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात,...

अंगणवाडी सेविका उतरल्या रस्त्यावर
आयटकने पुकारला ४८ तासाचा संप
नागपूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसंदर्भात शासनाने नेमलेल्या समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन(आयटक)ने ४८ तासाचा दिवस-रात्रीचा संप पुकारला आहे. या संपाच्या आवाहनानुसार शेकडो अंगणवाडी सेविकांनी सोमवारी संविधान चौकात दिवसभर आंदोलन करीत रात्रीचा मुक्काम केला. मंगळवारी पुन्हा दिवसभर आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाने गठित केलेल्या या समितीच्या तीन बैठका मंत्रालयात पार पडल्या. यानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव वनिता सिंगल यांनी शासनाला एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावामध्ये ३१ जानेवारी २०१६ पर्यंत सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना महिना २ हजार रुपये वाढ देण्याचा प्रस्ताव आहे तसेच मदतनिसांना सेविकेच्या तुलनेत ७५ टक्के वाढ देण्यात यावी. महागाईवाढीचा आढावा घेऊन दरवर्षी ५ टक्के मानधन वाढ द्यावी. मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकेप्रमाणे मानधन देण्यात यावे, यासोबतच अनेक शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात आणि अर्थसंकल्पात तशी तरतूद करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
ही मागणी मान्य न झाल्यास १ एप्रिलपासून बेमुदत संप सुरू होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
आयटकचे सरचिटणीस श्यामजी काळे यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेल्या या संपात जयश्री चहांदे, उषा चारभे, वनिता कापसे, रेखा कोहाड, ललिता कडू, शालिनी मुरारकर, मंगला नितनवरे, विद्या गजभिये, सीमा गजभिये, वीणा डोंगरे, मीना भिमटे, योगिता नवखरे, छाया पाटील आदींसह शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत. (प्रतिनिधी)