अंगणवाडी सेविकांचा पुन्हा एल्गार
By Admin | Updated: November 25, 2014 00:52 IST2014-11-25T00:52:38+5:302014-11-25T00:52:38+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

अंगणवाडी सेविकांचा पुन्हा एल्गार
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नागपूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांना मागण्यांचे निवेदन सादर करून चर्चा केली.
कर्मचाऱ्यांना नियमित मानधन, ३० एप्रिलपासून वाढीव अरिअर्स, जनश्री विमा योजना, थेट नियुक्ती, अंगणवाडी साहित्य, दिवाळी भाऊ बीज, आहार, पंचवार्षिक वाढ, पर्यवेक्षिका पदभरती आदी मागण्यांसंदर्भात युनियनचे राज्य सचिव श्याम काळे यांनी चर्चा केली. शिष्टमंडळात आशा बोदलखंडे, वनिता भिवनकर, चंद्रभागा राजपूत, कल्पना शेवाळे, मंगला चामट, ज्योती अंडरसहारे, विद्या गजभिये, शीला भोयर, सुनीता मानकर आदींचा समावेश होता. मागण्यांसंदर्भात महिला व बाल कल्याण विभागाला लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देऊन तीन दिवसात प्रतिनिधीसोबत बैठक घेण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तत्पूर्वी चाचा नेहरू बाल उद्यान येथून निघालेला मोर्चा संविधान चौकात पोहोचल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले. काळे यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात मोठ्या संख्येने महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)