अंगणवाडीचे बांधकाम रखडले
By Admin | Updated: August 6, 2014 01:14 IST2014-08-06T01:14:23+5:302014-08-06T01:14:23+5:30
महादुला येथे दोन अंगणवाड्या मंजूर आहेत. एका अंगणवाडीचे बांधकाम मंजूर असताना गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडीचे बांधकाम केले नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने अंगणवाडीच्या

अंगणवाडीचे बांधकाम रखडले
महादुला येथील प्रकार : जागेचा घोळ, चिमुकल्यांच्या जीवितास धोका
महादुला (रामटेक) : महादुला येथे दोन अंगणवाड्या मंजूर आहेत. एका अंगणवाडीचे बांधकाम मंजूर असताना गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडीचे बांधकाम केले नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने अंगणवाडीच्या इमारतीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून न दिल्याने बांधकाम रखडले असल्याचे समजते. सध्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओल्या खोलीत राहावे लागत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्पाद्वारे १ ते ६ वयोगटातील मुलांना उत्तम आरोग्य देण्यासाठी व त्यांना कुपोषणमुक्त जीवन देण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जातात. त्यांना उत्तम आरोग्य हे चांगल्या परिसरात व इमारतीत मिळू शकते. परंतु महादुला येथे चिमुकल्यांना ओल्या खोलीत राहावे लागत असल्याने पालक संताप व्यक्त करीत आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली असता, सर्व भिंतींना ओल आली आहे. तसेच तेथील जमिनीवर ओलावा असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
येथील अंगणवाडी केंद्रात एका खोलीचे प्लास्टर विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळण्याची भीती आहे. सिमेंटचे प्लास्टर एखाद्या मुलास जखमी करू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी येथे अंगणवाडी इमारतीस मंजुरी मिळाली. ग्रामपंचायतकडे त्याबाबत प्रस्ताव आला. त्यामुळे जागेचा शोध सुरू झाला. अंगणवाडीला लागूनच दुसरी अंगणवाडी इमारत तयार करण्याचे ठरले. परंतु यासाठी काही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. अंगणवाडी परिसरातील मोकळ्या जागेवर विविध कार्यक्रम होतात, त्यामुळे त्यास अडचण निर्माण होईल, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे येथे आमदार निधीतून व्यायाम शाळा बांधण्यात आली आहे. तेथे कुणीही व्यायाम करायला जात नाही. ही इमारत जैसे थे बेवारस पडली आहे.
दुसरी जागा आदिवासी वस्तीत देण्याचे ठरविण्यात आले. तेथेही विरोध झाला. तेथे आदिवासी जनता स्वत:चे बांधकाम करणार आहे. तेथील मोकळी जागा खोलगट असल्याने ठेकेदाराने लक्ष दिले नाही. तेव्हापासून हे काम ठप्प पडले आहे. (वार्ताहर)