अंगणवाडी, आशासेविकांना आयुक्तांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:45+5:302021-04-05T04:08:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : विभागीय आयुक्त डाॅ. संजीवकुमार रविवारी (दि. ४) कामठी शहराच्या दाैऱ्यावर आले हाेते. ते येत ...

अंगणवाडी, आशासेविकांना आयुक्तांना घेराव
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : विभागीय आयुक्त डाॅ. संजीवकुमार रविवारी (दि. ४) कामठी शहराच्या दाैऱ्यावर आले हाेते. ते येत असल्याचे कळताच तालुक्यातील अंणवाडी सेविका, आशासेविका व मदतनिसांनी त्यांचा ताफा मध्येच अडवला आणि त्यांना घेराव करीत त्यांच्या मूलभूत समस्या मांडल्या. रखडलेले तीन महिन्यांचे मानधन आणि काेराेनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षा किटची मागणी त्यांना डाॅ. संजीवकुमार यांच्यासमक्ष केली.
काेराेना संक्रमण काळात आशासेविका आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाेबत काम करीत असून, अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्वेक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने काेणतीही साधने पुरविली जात नसल्याने त्या काेराेना संक्रमित हाेण्याची शक्यता बळावली आहे. त्यातच आशासेविकांना तीन महिन्यांपासून मानधनही देण्यात आले नाही. या सेविकांना शासनाच्या वतीने ५० लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात आले असले तरी त्याचाही फारसा लाभ त्यांच्या कुटुंबीयांना मिळत नाही. त्यामुळे या समस्या साेडविण्यासाठी त्यांनी रविवारी कामठी शहरातील तहसील कार्यालयासमाेर ठिय्या मांडला हाेता.
विभागीय आयुक्त डाॅ. संजीवकुमार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांचा ताफा तहसील कार्यालयाच्या आवारात दाखल हाेताच या महिलांनी त्यांना थांबावून घेराव केला आणि आपापल्या समस्या सांगायला सुरुवात केली. समस्या सांगताना आशासेविकांना अश्रू अनावर झाले हाेते. त्यातच या महिलांच्या समजून घेत साेडविण्याचे निर्देशही डाॅ. संजीवकुमार यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिले.
....
एकीचा मृत्यू, एक संक्रमित
सुरक्षा साधनांच्या अभावामुळे कामठी तालुक्यात अंगणवाडी व आशासेविकांना काेराेनाची लागण व्हायला सुरुवात झाली आहे. यातील एका काेराेना संक्रमित अंगणवाडीसेविकेचा उपचारादरम्यान नुकताच मृत्यू झाला असून, अन्य एका अंगणवाडीसेविकेवर कामठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या महिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना महागडे उपचार घेणे शक्य हाेत नाही. शिवाय, त्यांच्यामुळे त्यांचे कुटुंबीयदेखील काेराेना संक्रमित हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.