प्रेरणादायी महिलांच्या नावाने ओळखल्या जाईल अंगणवाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST2021-03-08T04:07:30+5:302021-03-08T04:07:30+5:30
नागपूर : देशात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची नावे विविध वास्तूंना द्यायची जुनी परंपरा आहे. त्यांचे विचार-कृतीची ती प्रेरणास्थळे असतात. त्यामुळे त्यांच्या ...

प्रेरणादायी महिलांच्या नावाने ओळखल्या जाईल अंगणवाड्या
नागपूर : देशात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची नावे विविध वास्तूंना द्यायची जुनी परंपरा आहे. त्यांचे विचार-कृतीची ती प्रेरणास्थळे असतात. त्यामुळे त्यांच्या स्मृती चिरतरुण असतात, असे सांगितल्या जाते. असाच काहीसा संकल्प नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने केला आहे. विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांना प्रेरणादायी महिलांच्या नावाने नवी ओळख दिली आहे.
राज्यात पहिल्यांदाच ही संकल्पना जि. प.च्या महिला व बालकल्याण समितीने ठेवली. त्यासंदर्भात ठरावही मंजूर करून घेतला. देशाच्या इतिहासात अनेक महिलांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे राहिले आहे. सामाजिक क्षेत्राबरोबरच कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण, विज्ञान, संशोधन, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रांत उत्तुंग काम करणाऱ्या आणि करीत असलेल्या महिलांच्या नावाने अंगणवाडीला ओळख मिळाली आहे. नागपूर जिल्ह्यात २,१६१ अंगणवाड्या व २६२ मिनी अंगणवाड्या आहेत. प्रत्येक अंगणवाडीवर प्रेरणादायी महिलेच्या नावाची पाटी, सोबतच त्यांच्या छायाचित्रासह संक्षिप्त माहितीचा आढावा अंगणवाडीत लिहला आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंगणा तालुक्यातून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. डिगडोह (पांडे) येथील अंगणवाडीचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असे नाव करण्यात आले. त्याचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, शिक्षण सभापती भारती पाटील उपस्थित होते.
- या देशात महिलांचे योगदान प्रेरणादायी आहे. गावातील अंगणवाडीच्या माध्यमातून समाजाला व लाभार्थ्यांना अशा थोर महिलांची प्रेरणा मिळण्याचा उद्देश आहे. सोबतच या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे.
-उज्ज्वला बोढारे, सभापती, महिला व बालकल्याण विभाग