लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘त्या आल्या, त्या बोलल्या आणि त्यांनी जिंकले’...राजकारणात असे फारच थोड्या व्यक्तींबाबत होते. त्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचा वास होता अन् देशहितासाठी दूरदृष्टीचा अनोखा ध्यास होता. अगोदरच नागपूरचा उन्हाळा अन् प्रचाराची रणधुमाळी...अशा तापलेल्या वातावरणात येऊन भाषण करणे म्हणजे भल्याभल्यांची परीक्षा ठरते. परंतु प्रकृती खराब असतानादेखील त्यांनी इच्छाशक्तीतून मंचावरुन संवादाला सुरुवात केली अन् ‘मेरी प्यारी बहनों एवम् माताओं’ हे शब्द उच्चारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले. ज्येष्ठ महिलांपासून ते अगदी चिमुकल्या मुलामुलींपर्यंत सर्वांनीच उभे राहून त्यांचे अभिवादन केले. सर्वांच्या ध्यानी, मनी अन् ओठी एकच नाव होते, सुषमा, सुषमा, सुषमा !जीवघेण्या संकटाशी सामना करत असतानादेखील माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणुकांच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपूरला भेट दिली होती. दुर्दैवाने ती त्यांची अखेरची भेट ठरली. परंतु नागपूरच्या या भूमीतूनच त्यांनी राजकारण, समाजकारणाचे संस्कार घेतले. या भूमीतील विचारातूनच आपल्याला दिशा मिळाली असे त्या अभिमानाने सांगायच्या. या भूमीशी त्यांचा विशेष जिव्हाळा होता.२ एप्रिल २०१९ रोजी नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी जगनाडे चौकाजवळ त्या महिला मेळाव्याला उपस्थित राहिल्या होत्या. प्रकृती खराब असताना देखील आपली मूल्य व तत्त्व यांच्यासाठी त्या जिद्दीने उभ्या होत्या. कितीही त्रास झाला, अडचण आली तरी पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडायचीच हा दृढनिश्चय होता. तब्येतीमुळे उभे राहता येत नव्हते. यावर त्यांनी मार्ग शोधला व सोफ्यावर बसूनच महिलांशी संवाद साधला होता.काश्मीरच्या स्थितीवर केले होते भाष्यमृत्यूच्या काही तास अगोदर सुषमा स्वराज यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. योगायोगाने नागपुरातील आपल्या अखेरच्या मेळाव्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थितीवरच भाष्य केले होते. केंद्र सरकारने फुटीरवाद्यांच्या सवलती बंद केल्या व त्याची आवश्यकता होती, असे म्हणत त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर देशाच्या सैन्यशक्ती व कूटनीतीचा विजय कसा झाला यावर भाष्य केले होते.संघ संस्कारांचा होता अभिमानसुषमा स्वराज अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमांसाठी नागपुरात आल्या होत्या. संघातील अनेक पदाधिकारी व स्वयंसेवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. संघ संस्कारांचा मला अभिमान आहे, असे त्या नेहमी म्हणायच्या. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी स्त्री शक्तिपीठाच्या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. परराष्ट्र धोरण राबवित असताना त्यातून भारतीय संस्कृती व राष्ट्रहिताचे संस्कार दिसेल हाच प्रयत्न असतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
Sushma Swaraj Death: तब्येत बरी नसतानाही त्या नितीन गडकरींसाठी आल्या... बोलल्या आणि जिंकल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:13 IST
‘मेरी प्यारी बहनों एवम् माताओं’ हे शब्द उच्चारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले.
Sushma Swaraj Death: तब्येत बरी नसतानाही त्या नितीन गडकरींसाठी आल्या... बोलल्या आणि जिंकल्या!
ठळक मुद्देप्रकृती अस्वस्थ असतानादेखील केला होता गडकरींचा प्रचार