अन् मेहमूदला मिळाली जगण्याची उमेद
By Admin | Updated: November 19, 2016 03:05 IST2016-11-19T03:05:50+5:302016-11-19T03:05:50+5:30
एकदा रु ग्ण मनोरु ग्णालयात दाखल झाला की, श्वास थांबेपर्यंतचं आयुष्य दगडी भिंतीच्या मागे असते, आजही अनेकांचा असाच समज आहे.

अन् मेहमूदला मिळाली जगण्याची उमेद
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या प्रयत्नाला यश
नागपूर : एकदा रु ग्ण मनोरु ग्णालयात दाखल झाला की, श्वास थांबेपर्यंतचं आयुष्य दगडी भिंतीच्या मागे असते, आजही अनेकांचा असाच समज आहे. परंतु गुरुवारी हा समज खोटा ठरला. प्रादेशिक मनोरुग्णालयात महिन्याभरापूर्वी अनोळखी रुग्ण म्हणून शेख मेहमूद दाखल झाला. त्यावेळी त्याला बोलताही येत नव्हते.
परंतु डॉक्टरांच्या योग्य उपचाराने तो बरा झाला. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर संपर्क साधण्यात आला. आज बायको, पोराला समोर पाहताच त्याचा आनंद गगनात मावेनासा होता. त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली होती.
बकरी ईदच्या निमित्ताने कामाच्या ठिकाणाहून घरी जायला निघालेला मेहमूद आजारपणाने संभ्रमित झाला. सौंसर येथून आपल्या गावी सिंधी (पातालकोट), जिल्हा छिंदवाडा येथे जाण्याऐवजी नागपुरात भटकत राहिला. गंभीर मानसिक आजारामुळे आपले नाव व पत्ता सांगण्याच्या स्थितीतही मेहमूद नव्हता. त्याचे बोलणेच बंद झाले होते. महिन्याभरापूर्वी कोतवाली पोलिसांनी मेहमूदला पकडून प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे दाखल केले. मनोविकार व बधिरीकरण तज्ज्ञानी उपचाराची दिशा ठरविली. विशेष म्हणजे, त्याला दिलेल्या विद्युत कंपन उपचाराचा परिणाम दिसून येऊ लागला. न बोलणारा मेहमूद बोलू लागला. त्याने आपला पत्ताही सांगितला. मनोरुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ता यांनी त्याच्या पत्त्यावर संपर्क साधला.
आज गुरुवारी समोर पत्नी, मुलाला व नातेवाईकाना पाहून मेहमूदला गहिवरून आले. जगण्याची उमेद हरवलेल्या मेहमूदला रुग्णालयामुळे जगण्याचे बळ आणि स्वकीय मिळाले होते. जाताना तो सर्व डॉक्टरांना भेटला. इतर रुग्णांनाही माझ्यासारखे लवकर बरे करून घरी पाठवा, अशी विनंती करीत होता. (प्रतिनिधी)