अन् जोगारामला मिळाली दृष्टी
By Admin | Updated: May 30, 2016 02:37 IST2016-05-30T02:37:42+5:302016-05-30T02:37:42+5:30
दोन्ही डोळ्यातील मोतिबिंदूमुळे जोगाराम सिडामला काहीच दिसायचे नाही. यामुळे त्याचा हातचा रोजगारही गेला होता.

अन् जोगारामला मिळाली दृष्टी
२२६ रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया : लहाने व पारेख यांनी केल्या शस्त्रक्रिया
नागपूर : दोन्ही डोळ्यातील मोतिबिंदूमुळे जोगाराम सिडामला काहीच दिसायचे नाही. यामुळे त्याचा हातचा रोजगारही गेला होता. आर्थिक अडचणीत सापडलेला जोगाराम एका कार्यकर्त्याच्या मदतीने गडचिरोली येथून बुधवारी नागपुरात आला. आरोग्य महाशिबिरात त्याचा नंबर लागला. शनिवारी शस्त्रक्रिया झाली. गेल्या कित्येक महिन्यांपासून अंधारात चाचपडत असलेल्या जोगारामला रविवारी दिसायला लागले. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने रविवारी सकाळी तपासणीसाठी आले असताना त्याने त्यांचे पायच धरले आणि रडायला लागला.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातर्फे आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जोगाराम सिडामसारखे अनेक किस्से रविवारी अनुभवायला आले.
२५ मेपासून सुरू झालेल्या या आरोग्य महाशिबिरात ३० हजारावर रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात सर्वाधिक रुग्ण हे नेत्ररोगाशी संबंधित होते. यातील २७८ रुग्णांना मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी गुरुवारी आणि शुक्रवारी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्या वॉर्ड क्र. १३ व १४ मध्ये भरती करण्यात आले. विशेष म्हणजे हे दोन्ही वॉर्ड ३०-३० खाटांचे आहेत. परंतु रुग्णांची संख्या लक्षात घेऊन या दोन्ही वॉर्डात केवळ १०-१० खाटा ठेवण्यात आल्या. उर्वरित जागेवर खाली जमिनीवर गाद्या टाकण्यात आल्या. रुग्णांवरील उपचाराला सुरुवात झाली. यातील ५२ रुग्णांना मधुमेह असल्याने त्यांना विशेष उपचारासाठी पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
काळजी घ्या...
डॉ. लहाने यांनी मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वॉर्ड क्र. १३ मध्ये बोलावून घेतले. २२६ रुग्ण आणि १०० वर त्यांच्या नातेवाईकांमुळे वॉर्ड खच्चून भरला होता. विना ध्वनिक्षेपक डॉ. लहाने यांनी शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्यायला हवी याची माहिती दिली. यावेळी त्यांनी काय करू नये, हे रुग्णांकडून वदवूनही घेतले. यासाठी त्यांनी काही गमतीदार किस्सेही सांगितले.
चष्मे, औषधांचे वाटप
भाजपाचे महामंत्री व आरोग्य शिबिराचे संयोजक संदीप जोशी व प्रकाश भोयर यांच्या उपस्थितीत सर्व रुग्णांना काळे चष्मे व महिनाभर पुरेल एवढ्या औषधांचे वाटप केले. यावेळी जोशी म्हणाले, हे शिबिर येथे संपलेले नाही तर येथून सुरुवात झाली आहे. आता आम्ही यापेक्षा दुप्पट रुग्णांपर्यंत पोहचून त्यांची सेवा करू, असे म्हणत त्यांनी सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
सलग १७ तास
चालली शस्त्रक्रिया
शनिवारी सकाळी ८ वाजतापासून शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. ही शस्त्रक्रिया रात्री १ वाजेपर्यंत सुरू होती. सलग १७ तास पद्मश्री डॉ. लहाने यांनी ११३ रुग्णांवर तर डॉ. रागिणी पारेख यांनी ११३ रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली. त्यांच्यासोबतीला जे.जे.रुग्णालय, मुंबई व नागपूर मेडिकल कॉलेजच्या नेत्ररोग विभागाच्या डॉक्टरांची चमू होती. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत शस्त्रक्रिया होण्याची मेडिकलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. रविवारी सकाळी डॉ. लहाने यांनी सर्व रुग्णांची तपासणी केली. यावेळी अनेकांनी त्यांना अलिंगन देत कोणी पाया पडत आपल्या भावना व्यक्त करीत होते.