...अन् धम्म क्षितिजावर मावळला प्रज्ञेचा महासूर्य
By Admin | Updated: December 6, 2015 03:08 IST2015-12-06T03:08:01+5:302015-12-06T03:08:01+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोट्यवधी दलितांचे मसिहाच. गावकुसाबाहेरच्या वस्तीला सन्मानाने जगणे ...

...अन् धम्म क्षितिजावर मावळला प्रज्ञेचा महासूर्य
बाबासाहेबांच्या मृत्यूवार्तेने हादरले अनुयायी : दामू मोरेंच्या अंगावर आजही उठतो काटा
आनंद डेकाटे नागपूर
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोट्यवधी दलितांचे मसिहाच. गावकुसाबाहेरच्या वस्तीला सन्मानाने जगणे शिकविणाऱ्या या महामानवावर त्यांच्या अनुयायांचे जीवापाड प्रेम होते. सामाजिक क्रांतीचे अनेक नवीन अध्याय लिहिण्यासाठी हे अनुयायी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे निघाले होते. परंतु अखेर तो काळा दिवस उगवला जेव्हा निसर्गनियमानुसार बाबासाहेबांनाही हे जग सोडावे लागले. त्यांच्या महापरिनिर्वाणाचे वृत्त पहिल्यांदा दामू मोरे यांनी जाहीर केले. हे वृत्त ऐकताच काही संतापलेले अनुयायी भावनावेगात मोरेंना मारायला उठले. परंतु वृत्त खरे असल्याचे कळताच ओक्साबोक्सी रडायला लागले. तो क्षण आठवला की दामू मोरेंच्या अंगावर आजही काटा उठतो.
मोरे सांगतात, नागपुरात पहिल्यांदा जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाल्याचे वृत्त लाऊड स्पिकरवर दिले जात होते तेव्हा काही लोक रडायलाच बसले तर काही ते वृत्त सांगणाऱ्या मुलाला मारायला धावले. अनेकांनी तर वृत्त खोटे निघाल्यास जिवंत गाडण्याची धमकीच दिली. परंतु जेव्हा ते वृत्त सांगत असताना त्या मुलाच्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा वाहत असल्याचे पाहून लोक शांत झाले आणि थेट मुंबईला निघण्याची तयारी करू लागले. रिक्षावर बसून शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाचे वृत्त लाऊडस्पिकरवरून सांगणारा तो मुलगा म्हणजे दामू मोरे. आजही तो प्रसंग आठवला तर दामू मोरे यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात.
दामू मोरे आज ८७ वर्षांचे आहेत. त्यांचे काका नामदेवराव मोरे हे नागपूर शहरात प्रसिद्ध होते. त्यांचा साऊंड सर्व्हिसचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांचे अनेकांशी संबंध होते. दामू मोरे हे तेव्हा १७ वर्षांचे होते. ते आपल्या काकासोबतच काम करायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्म दीक्षा समारंभामध्ये साऊंड सर्व्हिसचे कामही मोरे यांनीच सांभाळले होते.
मोरे यांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आजही तसाच उभा राहतो. ६ डिसेंबर १९५६ चा तो दिवस होता. पहाटे ४ वाजताची वेळ होती. दरवाजावरून कुणी मोरे साहेब..मोरे साहेब म्हणून जोरात आवाज देत होते. इतवारीतील त्या दोन माळ्याच्या घरात दामू आपल्या काकासोबतच राहत होते. ते खालीच झोपले होते. ते लगेच उठले आणि दरवाजा उघडला. तेव्हा दरवाजावर रेवाराम कवाडे एच. एल. कोसारे, माणके गुरुजी ही ज्येष्ठ मंडळी होती. त्यांनी दामूंना काकाला आवाज देण्यास सांगितले. त्यांनी काकाला बोलावून आले. नामदेवराव यांना पाहताच रेवाराम कवाडे यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ते केवळ ‘बाबा गेले’ म्हणाले आणि रडायला लागले. काही क्षण रडण्यात गेला. नंतर बाबासाहेबांच्या निधनाचे वृत्त शहरवासीयांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. काका नामदेवराव यांनी एक लाऊडस्पिकर आणि रिक्षा घेऊन शहरभर फिरून बाबासाहेबांच्या निधनाचे वृत्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दामूंवर सोपविली. त्यानंतर कुणीच झोपले नाही. थेट तयारीला लागले. एक रिक्षा बोलावण्यात आला. त्यावर लाऊडस्पिकर घेऊन दामू निघाले. तेव्हापर्यंत ६ वाजले होते. शुक्रवारीपासून त्यांनी सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाल्याचे म्हणताच तीन जण त्यांच्यादिशेने धावून आले. एकाने मारण्यासाठी हात उगारला. परंतु काही लोकांनी त्याला समजावले. सर्वांनी दामूला विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, खरेच बाबा गेले. तेव्हा लोक रडायलाच लागले.
शहरातील प्रत्येक वस्तीमध्ये दामूंना असाच प्रत्यय आला. कुणी बातमी ऐकूण रडायला लागायचे तर कुणी मारायलाच धावायचे. अनेक जण तर ‘बातमी खोटी ठरली तर तुला जिवंत गाडीन’ अशी धमकीही देत होते. लाऊड स्पिकरवर शहरभर सांगून झाले.
तेव्हापर्यंत १०-१०.३० वाजले होते. खलाशी लाईनकडून दामू परत येत होते. तेव्हा त्यांना रेल्वे स्थानकाकडे जाणारे अनेक लोक दिसले. ते सर्व मुंबईला बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला निघाले होते.
दीक्षा समारंभाचा तो संपूर्ण प्रसंग आठवला
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी लोकांना कशी सांगायची. ते मला लिहून देण्यात आले होते. ते मी वाचत होतो लोक रडायचे. काही मारायलाही धावायचे. परंतु मलासुद्धा रडू येत होते. एकेक शब्द वाचताना जड जात होते. धम्मदीक्षेच्या समारंभाप्रसंगी मी स्टेजजवळ होतो. त्यामुळे बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलेला एकेक शब्द मला तेव्हा आठवू लागला होता. दीक्षा समारंभाचा संपूर्ण प्रसंगच समोर येत होता. त्यामुळे माझ्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा वाहत होत्या. आजही तो प्रसंग आठवला तर भावना अनावर होतात.
नागपुरात अस्थिकलश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थिंचा एक भाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि धम्मदीक्षा सोहळ्याचे संयोजक वामनराव गोडेबोले यांना सुद्धा देण्यात आला. गोडेबोले बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि घेऊन नागपूरला निघाले. ९ डिसेंबर १९५६ रोजी दुपारी २.३० वाजता वामनराव गोडेबोले मुंबई-हावडा एक्स्प्रेसने नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले. आपल्या डोक्यावर अस्थि घेऊन ते उतरले. त्यावेळी हजारो लोक रेल्वे स्टेशनवर अस्थिंच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर अस्थि शहरभर फिरवण्यात आल्या. त्यानंतर सीताबर्डी येथील बौद्धजन समितीच्या कार्यालयात बाबासाहेबांच्याअस्थि सर्वांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आल्या.