अन् आपला राजीनामा पाहून गडकरी झाले आश्चर्यचकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:25 IST2018-11-12T17:23:50+5:302018-11-12T17:25:28+5:30
जादूगराच्या विविध करामती पाहिल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना एक प्रमाणपत्र लिहून दिले. परंतु जादुगराने आपल्या हाताची कमाल दाखवित सफाईने या सर्टिफिकेटला गडकरी यांच्या राजीनाम्यात बदलविले.

आपला राजीनामा वाचून जोरात हसतांना गडकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जादूगराच्या विविध करामती पाहिल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना एक प्रमाणपत्र लिहून दिले. परंतु जादुगराने आपल्या हाताची कमाल दाखवित सफाईने या सर्टिफिकेटला गडकरी यांच्या राजीनाम्यात बदलविले. जेव्हा ते पत्र गडकरी यांच्या हातात आले तेव्हा ते ही आश्चर्यचकित झाले आणि जोर-जोराने हसू लागले.
निमित्त होते दिलीप चिंचमलातपुरे यांच्या येथे आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमाचे. गडकरी यांचे जुने मित्रही या समारंभात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान सर्वांच्या मनोरंजनासाठी जादूगर एन.सी. सरकार यांना बोलावण्यात आले होते. जादूगर सरकार यांनी विविध कार्यक्रम सादर केले आणि नंतर गडकरी यांना एक प्रमाणपत्र लिहून दिले. ते टाईप केलेले होते. त्यात गडकरी यांनी त्यांच्या विभागात किती चांगले काम केले आहे, त्याचे कौतुक होते. नंतर ते काही जणांना वाचायला दिले. त्यांनीही ते मोठ्याने वाचून दाखविले. नंतर ते गडकरी यांच्या हातात देऊन वाचून दाखवण्याची विनंती केली. गडकरी यांनी ते प्रमाणपत्र वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्यात लिहिले होते की, ‘मी संन्यास घेऊन हिमालयात जात आहे आणि आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. उद्यापासून माझे पद श्री एन.सी. सरकार सांभाळतील.’’ हे वाचत असतांना गडकरी यांनाही हसू आवरता आले नाही. ते जोरजोराने हसू लागले, आणि त्यांच्यासोबत इतरही हसू लागले.