नागपुरात पाण्याची गळती शोधताना सापडला पुरातन नाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:17 IST2019-11-27T22:15:57+5:302019-11-27T22:17:55+5:30
मागील १५ दिवसांपासून सुरू असलेली पाण्याची गळती शोधताना इतवारी भागातील वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा) येथे रस्त्याच्या सात फूट खाली पुरातन नाला आढळून आला.

नागपुरात पाण्याची गळती शोधताना सापडला पुरातन नाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील १५ दिवसांपासून सुरू असलेली पाण्याची गळती शोधताना इतवारी भागातील वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा) येथे रस्त्याच्या सात फूट खाली पुरातन नाला आढळून आला. बुधवारी महापौर संदीप जोशी यांनी घटनास्थळाची पाहणी करून नाल्याचे पुनर्निर्माण करण्याचे आदेश दिले.
इतवारी भागातील होलसेल क्लॉथ मार्केटजवळील नंगा पुतळा येथे रस्त्यावर पाणी वाहत होते. यासंदर्भात नागरिकांकडून तक्रार मिळाल्याने ओ.सी.डब्ल्यू. व जलप्रदाय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी गळती शोधण्याचा प्रयत्न केला. वारंवार शोधूनही गळती न सापडल्यानंतर रविवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यानंतरही पाणी वाहत असल्याने सदर ठिकाणी खोदकाम करण्यात आले. खोदकाम करताना रस्त्याच्या सात फूट खाली नाला असल्याचे निदर्शनास आले.
नाल्याची स्लॅब तोडून नाल्यातील कचरा आणि माती काढण्यात आली. यावेळी १० मीटर अंतरावर नाल्याच्या स्लॅबच्या खाली १५ इंचाची जुनी पाण्याची वाहिनी असून त्याखाली स्वयंचलित मशीनने टाकण्यात आलेल्या आॅप्टिकल फायबर केबलच्या पाईपमुळे सुमारे अडीच फुटाचा अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. नाल्याची भिंत दगडाची असल्याने केबल टाकताना दगड कोसळले असावेत व दगड आणि पाईप यामुळे कचरा जमा होऊन हळूहळू नाला बुजला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
नाल्याची स्लॅब तोडून सफाई करण्यात आल्यानंतर पुढे नाल्याचा प्रवाह सुरळीत असल्याचे दिसून आले. मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि पोकलेनच्या माध्यमातून नाल्यातील कचरा आणि माती काढून नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. सलग तीन दिवस प्रयत्न केल्यानंतर अखेर रस्त्यावरून पाणी वाहणे बंद झाले. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात उपअभियंता रवींद्र बुंधाडे, कनिष्ठ अभियंता सुरेंद्र दुधे, तांत्रिक सहायक दुमाने, वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक सुरेंद्र खरे, प्रभारी स्वास्थ निरीक्षक विपीन समुंद्रे यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात आली. अतिव्यस्त भागातील वाहतूक समस्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात आली.
कामाचे गांभीर्य लक्षात घेत नाल्याच्या ठिकाणी बांधकामाबाबत त्वरित नस्ती तयार करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश संदीप जोशी यांनी गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांना दिले.