आनंद साई सोसायटीला ग्राहक आयोगाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:22+5:302021-03-26T04:09:22+5:30

नागपूर : आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा जोरदार दणका बसला आहे. तक्रारकर्त्या महिलेला ...

Anand Sai Society hit by Consumer Commission | आनंद साई सोसायटीला ग्राहक आयोगाचा दणका

आनंद साई सोसायटीला ग्राहक आयोगाचा दणका

नागपूर : आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा जोरदार दणका बसला आहे. तक्रारकर्त्या महिलेला मुदतठेवीचे ६ लाख ५० हजार रुपये मंजूर व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश आयोगाने सोसायटीला दिला आहे.

नंदा रोकडे असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव असून, त्या गणेशनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा दिलासा दिला. आयोगाने रोकडे यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ४० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी २० हजार रुपये भरपाईदेखील मंजूर केली आहे. ही रक्कम सोसायटीनेच द्यायची आहे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सोसायटीला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. सोसायटीमध्ये रोकडे यांच्या एक लाख रुपयाच्या पाच व दीड लाख रुपयाची एक मुदतठेव आहे. तक्रारीतील माहितीनुसार, रोकडे यांना संबंधित मुदतठेवींवर दर महिन्याला एकूण ७ हजार ४१ रुपये व्याज दिले जात होते. त्यांना मार्च-२०१८ पासून व्याज देणे बंद करण्यात आले. त्यानंतर रोकडे यांनी सोसायटीला मुदतठेवीची रक्कम व व्याज देण्याची अनेकदा विनंती केली. कायदेशीर नोटीसही बजावली. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवर आयोगाने सोसायटीला नोटीस बजावली, पण ते हजर झाले नाही. परिणामी, तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर हा निर्णय देण्यात आला.

Web Title: Anand Sai Society hit by Consumer Commission