आंबेडकरांच्या कामगार विचारांचे विश्लेषण गरजेचे; सुखदेव थोरात यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 19:42 IST2022-02-11T19:41:43+5:302022-02-11T19:42:12+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगार विचारांचे विश्लेषण होणे गरजेचे असल्याचे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

आंबेडकरांच्या कामगार विचारांचे विश्लेषण गरजेचे; सुखदेव थोरात यांचे मत
नागपूर : असमानतेवर आधारित जातीव्यवस्थेचा परिणाम मजुरांवर होत असून, कामगारांना आजही मालकांची संपत्ती म्हटले जाते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगार विचारांचे विश्लेषण होणे गरजेचे असल्याचे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.
स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने हजारी पहाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्रात भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेधाजी लोखंडे यांच्या १२५व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘भारतीय कामगार चळवळ व आगामी संघर्षाची दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी मनोहर कदम लिखित ‘भारतीय मजदूर आंदोलन के प्रणेता रावबहादूर नारायण मेधाजी लोखंडे’ या हिंदी आवृत्तीचे व युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जारोंडे लिखित ‘कामगार चळवळ : भूमिका व तत्त्वज्ञान’ या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण मेधाजी लोखंडे यांच्या चित्राचेही प्रकाशन करण्यात आले.
दलित कामगार हे अनेक कारणांमुळे नियमित रोजगार मिळण्यापासून वंचित ठरत असल्याचे अनेक अभ्यासांवरून सिद्ध झाले आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार भारतातील दलित कामगारांमधील बेरोजगारीचा दर सर्वाधिक ६.९ टक्के असल्याचे थोरात यावेळी म्हणाले. प्रास्ताविक नरेंद्र जारोंडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन अजित खान पठाण यांनी केले तर आभार स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियनचे सरचिटणीस विकास गौर यांनी मानले.
............