‘लिकेज’मुळे होणारी पाणी नासाडी थांबविणार ‘अमृतम्’
By Admin | Updated: June 12, 2017 02:23 IST2017-06-12T02:23:04+5:302017-06-12T02:23:04+5:30
उन्हाळा आला की शहरातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. ‘पाणी बचावो’ मोहिमांना वेग मिळतो.

‘लिकेज’मुळे होणारी पाणी नासाडी थांबविणार ‘अमृतम्’
विद्यार्थी-महाविद्यालयाचा पुढाकार : विशेष ‘अॅप’ची निर्मिती
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळा आला की शहरातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. ‘पाणी बचावो’ मोहिमांना वेग मिळतो. मात्र प्रत्यक्षात अनेक घरांमधील नळांमध्ये ‘लिकेज’ असल्यामुळे वर्षभरात लाखो लिटर पाणी वाया जाते. ही बाब अनेकदा लोक गंभीरतेने घेत नाहीत. यासंदर्भातच जनजागृतीसाठी काही विद्यार्थी सरसावले आहेत. नळांमधून होणारी ही पाण्याची अनावश्यक गळती थांबविण्यासाठी ते अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून उपाययोजनादेखील सुचविणार आहेत. नागरिकांच्या घरातून दररोज किती पाणी वाया जाते याचा अभ्यास करण्यासाठी ‘अमृतम्’ या विशेष मोबाईल ‘अॅप’चीदेखील निर्मिती करण्यात आली आहे.
‘नागपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयाच्या ‘इनोव्हेटिव्ह सेल’तर्फे हा उपक्रम राबविण्याची संकल्पना समोर आली. शहरातील अनेक घरांमध्ये ही समस्या आहे. कुठे नळ तर कुठे ‘फ्लश’मध्ये ‘लिकेज’ असते. यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. अनेकदा तर लोकांना ‘लिकेज’ची माहितीदेखील नसते. यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच कायमस्वरूपी तांत्रिक उपाय काढता यावा या उद्देशाने महाविद्यालयाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.
सुरुवातीला हे विद्यार्थी दर शनिवार-रविवार शहरातील प्रभागांमधील घरांना भेटी देतील. यावेळी नागरिकांच्या घरातील जलप्रणालीची ते पाहणी करतील व कुठे ‘लिकेज’ आहे का ते तपासतील. त्यानंतर संबंधित घरातून नेमके किती पाणी दर दिवसाला ‘लिकेज’मुळे वाया जाते ते तपासण्यासाठी संबंधितांच्या मोबाईलवर ‘अॅप’ टाकून देतील. या ‘अॅप’च्या माध्यमातून नेमके किती पाणी वाया जात आहे याचा ‘डाटा’ एकत्र करण्यात येईल. त्यानंतर सविस्तर अभ्यास करून विस्तृत अहवाल नागपूर महानगरपालिकेला सादर करण्यात येईल. शिवाय समस्येवर कायमस्वरूपी उपायदेखील सुचविण्यात येईल.
‘बूंद बूंद बचाओ’ हीच भुमिका
संबंधित योजना माझ्या मनात अनेक वर्षांपासून होती. अखेर या वर्षी ती प्रत्यक्षात उतरते आहे.
संगणक विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयातील २०० विद्यार्थी यात स्वयंसेवक म्हणून काम करतील. सहा महिन्यांत साधारणत: दोन लाख घरापर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे. या उपक्रमात आम्हाला ‘नीरी’चीदेखील मौलिक साथ लाभत असून पाणी वाचविण्यासंदर्भातील तांत्रिक बाबींमध्ये ते सहकार्य करणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कडू यांनी दिली.