प्रवासी घाबरले : नागपूर-गोधनी रेल्वेस्थानकादरम्यानची घटनानागपूर : अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसवर अज्ञात आरोपींनी शनिवारी रात्री १०.३० वाजता गोधनी ते नागपूर दरम्यान दगडफेक केल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचा ताफा घटनास्थळी रवाना झाला. रेल्वेगाडी क्रमांक १२१५९ अमरावती-जबलपूर ही गाडी धावत असताना रात्री १०.३० वाजता नागपूरवरून ही गाडी काटोलकडे जात होती. तेवढ्यात नागपूर ते गोधनी दरम्यान अज्ञात आरोपीने या गाडीच्या एस ४ कोचवर दगड भिरकावले. लगेच या कोचमधील प्रवाशांनी या गाडीवर दगडफेक होत असल्याची सूचना गाडीतील टीसीला दिली. टीसीने याबाबत नागपूर येथील उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयास माहिती दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. परंतु तोपर्यंत ही गाडी पुढील प्रवासासाठी निघून गेली होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दगडफेक करणाऱ्या आरोपींचा परिसरात शोध घेतला. परंतु त्यांना कुणीच आढळले नसल्याने ते परत निघून आले. (प्रतिनिधी)
अमरावती-जबलपूर गाडीवर दगडफेक
By admin | Updated: June 23, 2014 01:15 IST