अमोल ढाकेचे मराठवाड्यात बस्तान
By Admin | Updated: December 6, 2014 02:37 IST2014-12-06T02:37:32+5:302014-12-06T02:37:32+5:30
सात्त्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीचा प्रमूख अमोल ढाके याने फरार होण्यापूर्वी आपल्या स्थावर संपत्तीची पद्धतशीर विल्हेवाट लावली आहे.

अमोल ढाकेचे मराठवाड्यात बस्तान
नागपूर : सात्त्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीचा प्रमूख अमोल ढाके याने फरार होण्यापूर्वी आपल्या स्थावर संपत्तीची पद्धतशीर विल्हेवाट लावली आहे. निवासस्थान आणि कार्यालय त्याने १० महिन्यांपूर्वीच विकल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, फरार ढाकेने मराठवाड्यात बस्तान बसवल्याचे सांगितले जाते.
आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्याने गेल्या नऊ वर्षांत शेकडो ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. गेल्या वर्षी श्रीसूर्याचा संचालक समीर जोशी आणि त्याच्या पाठोपाठ प्रशांत वासनकर या दोघांच्या कंपन्यांची बोगसबाजी उघड झाल्यानंतर अमोल ढाकेने आपला गाशा गुंडाळणे सुरू केले. रक्कम परत मागण्यास आलेल्यांना तो आणि त्याचे साथीदार वेगवेगळे कारण सांगून ठेवीदारांना परत पाठवीत होते. याचदरम्यान अमोल ढाकेने विविध बँकांमधील संपूर्ण रक्कम काढून घेतली. भरतनगरातील निवासस्थान आणि कार्यालयही विकले. कार्यालयाच्या विक्रीतून त्याला १ कोटी ६० लाख रुपये मिळाले. ही रक्कम तसेच अन्य स्थावर मालमत्तेतून मिळालेली रक्कम घेऊन अमोल ढाके नागपुरात पळून गेला. त्याची बनवाबनवी उघड झाल्यानंतर ठेवीदारांपैकी १६ जणांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली.
बँक खाते सील
पोलिसांनी या तक्रारीवरून अमोल ढाके तसेच सात्त्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीचे आरोपी प्रीती ढाके, महेंद्र कोहाड, अतुल दीक्षित, संदीप महाजन आणि मोहन जोशी या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यातील मुख्य आरोपी अमोल ढाकेने सहपरिवार मराठवाड्यात बस्तान बसवल्याचे समजते. अन्य आरोपी नागपूर-विदर्भातच दडून असल्याचे समजते.
प्राथमिक चौकशीत पोलिसांना अमोल ढाकेच्या दोन बँक खात्यांची माहिती मिळाली. ही दोन्ही खाती आज पोलिसांनी सील केली आहे. समृद्धी को-आॅप. आणि इंडियन ओव्हरसीज बँकेत ही खाती आहेत. या खात्याचा अहवाल पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांना मागितला असून, अंबाझरीचे ठाणेदार अनिक कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)