अंबाझरी चकाचक!
By Admin | Updated: May 3, 2015 02:11 IST2015-05-03T02:09:41+5:302015-05-03T02:11:14+5:30
नागनदी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर महापालिकेने अंबाझरी तलाव व परिसरात स्वच्छता अभियान हाती घेतले आहे.

अंबाझरी चकाचक!
नागपूर : नागनदी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर महापालिकेने अंबाझरी तलाव व परिसरात स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी श्रमदानातून तब्बल ३६ टन कचरा गोळा क रून हा परिसर स्वच्छ केला.
अंबाझरी परिसरातील नागरिक सकाळी व सायंकाळी फिरायला येतात. तसेच शहरातील नागरिक व लहान मुलांची येथे गर्दी असते. परंतु मागील काही वर्षात उद्यानाला अवकळा आली आहे. तलावातही मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. भारत सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत मनपाच्या सर्व झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्यानात स्वच्छता अभियान राबविले. महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, आयुक्त श्रावण हर्डीकर, झोनच्या सभापती सारिका नांदूरकर, वर्षा ठाकरे आदींनी सकाळी ७ ते १० दरम्यान श्रमदानात सहभाग घेतला. तलावाच्या काठावरील जॉगिंग ट्रॅक स्वच्छ केला.
मनपातर्फे दर शुक्रवारी सकाळी ८ ते १० या कालावधीत झोननिहाय स्वच्छता अभियान राबविले जाते. दटके व हर्डीकर यांच्या संकल्पनेतून सर्व झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊ न अंबाझरी उद्यान परिसराची स्वच्छता केली. २८ एप्रिलला अंबाझरी तलाव व परिसराची पाहणी करून श्रमदानाचा निर्णय घेण्यात आला होता. एक किलोमीटर लांबीचा तलावाचा बांध दहा झोनमध्ये विभाजित करून प्रत्येक झोनला १०० मीटरचा बांध (जॉगींग ट्रॅक)व त्या लगतचा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
त्यानुसार प्रत्येक झोनमधील सहायक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मुख्यालयातील विभाग प्रमुख यांना सहकार्यासाठी नेमण्यात आले होते.
उपायुक्त संजय काकडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक, नगरयंत्री संजय गायकवाड, विकास अभियंता राहुल वारके, कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक दासरवार, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता मनोज तालेवार, श्याम चव्हाण, रंजना लाडे, स्थावर अधिकारी डी.डी. जांभुळकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वाहतूक अभियंता एस.एल. सोनकुसरे, एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, यांच्यासह झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, राजेश कऱ्हाडे, विजय हुमणे, डी.डी.पाटील, महेश मोरोणे, अशोक पाटील, हरीश राऊ त, प्रकाश वऱ्हाडे, राजू भिवगडे यांच्यासह झोनचे उपअभियंता, आरोग्य झोनल अधिकारी, ग्रीन व्हीजल फाऊं डेशनचे दक्षा बोरकर, सुरभी जैस्वाल, सर्पमित्र गौरांक वाईकर, अतुल तरारे यांच्यासह नागरिकांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
महापौर, आयुक्तांचा प्रत्यक्ष सहभाग
पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रवीण दटके व श्रावण हर्डीकर यांनी स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी जोमाने कामाला लागले. अंबाझरी बांधाचा उतार जास्त असल्याने दोरखंंडाच्या सहाय्याने हात धरून कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्यांना कोणत्याही स्वरुपाची इजा होऊ नये यासाठी अग्निशमन विभागातर्फे दोन बोटी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती.
३६ टन कचरा गोळा केला
स्वच्छता अभियानादरम्यान तलाव व उद्यान परिसरात पडलेल्या प्लास्टीक बॉटल, पालापाचोळा गोळा करण्यात आला. काटेरी झुडपे, गवत काढून गोळा करण्यात आले. श्रमदानातून तब्बल ३६ टन कचरा गोळा करण्यात आला. नागनदी प्रमाणे अंबाझरी तलावाचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. यात नागरिकांचाही सहभाग होता.