आंबेडकर रुग्णालय बंद पडणार!
By Admin | Updated: January 17, 2017 02:03 IST2017-01-17T02:03:14+5:302017-01-17T02:03:14+5:30
कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राला ११ वर्षे होऊनही हे रुग्णालय केवळ बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे.

आंबेडकर रुग्णालय बंद पडणार!
आरोग्य विभाग : आपले डॉक्टर काढून घेणार, दोन वर्षात काहीच झाले नाही
सुमेध वाघमारे नागपूर
कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राला ११ वर्षे होऊनही हे रुग्णालय केवळ बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत (डीएमईआर) हे रुग्णालय मेयोच्या देखरेखीखाली चालविले जात असले तरी डॉक्टरांची चमू ही सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. या डॉक्टरांना काढून इतरत्र हलविण्याचा निर्णय नुकताच आरोग्य विभागाने घेतल्याची माहिती आहे. असे झाल्यास उत्तर नागपूर व कामठी भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेले हे रुग्णालय बंद पडण्याची शक्यता आहे.
डॉ. आंबेडकर रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र, क्ष-किरण, पॅथालॉजी व सोनोग्राफी विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. हे रुग्णालय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिपत्याखाली सुरू आहे. परंतु डॉक्टर, तंत्रज्ञ आणि पुरेसे मुनष्यबळ नसल्याने यातील एक जरी रजेवर गेल्यास रुग्णसेवा प्रभावित होते. विशेष म्हणजे, या रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्था स्थापन करण्यावर निर्णय ३ मार्च २०१४ रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधीही मंजूर करण्यात आला. पाच वर्षांमध्ये हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार होता. ५६८ खाटांचे हे रुग्णालय होणार होते. डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी १०७३ पदे भरण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु गेल्या दोन वर्षात यावर काहीच झाले नाही. उलट रुग्णालयात मोजकेच उपचार तेही ठराविक वेळेसाठीच होत असल्याने, एकेकाळी ७०० वर असलेले बाह्यरुग्ण विभाग आता केवळ ४०० वर आले आहे. दुसरीकडे लवकरच सार्वजनिक आरोग्य विभागाचे नागपुरात जिल्हा रुग्णालय होऊ घातले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्टरांची चमू लागणार आहे. त्याची तयारी म्हणून नुकत्याच झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रातून आरोग्य विभागाचे डॉक्टर काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच महिन्यात २४ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘डीएमईआर’सोबत बैठकीत याची माहिती दिली जाणार आहे.
अख्खे रुग्णालय होणार रिकामे
सार्वजनिक आरोग्य विभागाचे विविध विषयाचे पाच डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ असे मिळून १५वर मनुष्यबळ आहे. ‘डीएमईआर’अंतर्गत हे रुग्णालय चालविले जात असले तरी त्यांचा एकही डॉक्टर येथे सेवा देत नाही. केवळ काही निवासी डॉक्टरांची मदत घेतली जाते. आरोग्य विभागाने आपले मनुष्यबळ काढून घेतले तर ‘डीएमईआर’ला मेयो व मेडिकलमधून डॉक्टर उपलब्ध करून द्यावे लागणार आहे, परंतु सध्याच्या स्थिती पाहता ते शक्य नसल्याचे एका वरिष्ठ डॉक्टराने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.