‘आनंद सागर’च्या धर्तीवर अंबाझरीचा विकास
By Admin | Updated: July 2, 2014 01:01 IST2014-07-02T01:01:55+5:302014-07-02T01:01:55+5:30
स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यटनावर विशेष भर दिला आहे. त्यांनी अर्थसंकल्पात ‘पर्यटन शहर, नागपूर शहर’चा नारा दिला असून, अंबाझरी उद्यानाचा

‘आनंद सागर’च्या धर्तीवर अंबाझरीचा विकास
अर्थसंकल्प : ‘पर्यटन शहर, नागपूर शहर’चा नारा
नागपूर : स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यटनावर विशेष भर दिला आहे. त्यांनी अर्थसंकल्पात ‘पर्यटन शहर, नागपूर शहर’चा नारा दिला असून, अंबाझरी उद्यानाचा ‘आनंद सागर’च्या धर्तीवर विकास करण्याची योजना सादर केली आहे. या प्रकल्पासाठी ६४ कोटी रुपये खर्च येईल. बीओटी तत्त्वावर हा प्रकल्प साकारण्यात येणार असल्यामुळे महापालिकेवर याचा एक रुपयाचाही बोझा पडणार नाही. प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यात अॅम्युजमेंट पार्क, क्लब हाऊस, स्कल्पचर गार्डन, वॉटर राइडर्स, लेजर शो, मिनी इंडिया, रेस्टिंग हट्स, लॉन, फूड झोन, पार्किंग आदी सुविधा राहतील. प्रकल्पावर कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. महापालिकेची आर्थिक स्थिती खराब आहे. यासाठी बीओटी तत्त्वावर आधारित प्रकल्पांवरच अर्थसंकल्पात अधिक भर देण्यात आला आहे. बीओटी तत्त्वावर आधारित बहुतांश प्रकल्प पूर्व नागपुरात साकारले जात आहेत. वाठोडा येथे क्रीडा संकुल, व्यावसायिक संकुल, क्लब हाऊस, लॉनतयार केले जाईल. क्वेटा कॉलनी येथे देवडिया भवनच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अत्याधुनिक हॉस्पिटल तयार केले जाईल. महालस्थित बुधवार बाजार बीओटी तत्त्वावर विकसित केला जाईल. सक्करदरा चौकातील बुधवार बाजार व शॉपिंग मॉल बांधण्याचादेखील प्रस्ताव आहे.
दूषित पाणी शुद्धीकरणावर भर
शहरातून दररोज निघणाऱ्या सांडपाण्यापैकी ३४५ ते ४०० एमएलडी दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी काही योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. भांडेवाडी मलनिस्सारण केंद्राची क्षमता २०० एमएलडी करायची आहे. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत ४९,११४ कोटी रुपये खर्चून उत्तर सिवरेज झोनअंतर्गत सिवर लाईन टाकली जाईल. पाच एमएलडीचे दोन लहान एसटीपी मोक्षधाम व मानकापूर येथे उभारले जात आहेत.
अवैध नळ कनेक्शन वैध होणार
अर्थसंकल्पात पाणीपट्टीपासून तब्बल १५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. याबाबत सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी सांगितले की, जलकरापासून उत्पन्नवाढीसाठी उपाय योजले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अवैध नळ कनेक्शन वैध करून त्यांच्याकडून जलकर वसूल केला जाईल.
असा आहे अर्थसंकल्प
५७२ व १९०० ले-आऊटपैकी महापालिकेला हस्तांतरित २३३ ले-आऊटच्या विकासासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद.
महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेल्या नरसाळा व हुडकेश्वर येथील ९७२.८० हेक्टर क्षेत्राच्या विकासासाठी पाच कोटींची तरतूद.
हजारी पहाड गावाच्या विकासासाठी २५ लाख, पुनापूर व पारडी गावाच्या विकासासाठी एक कोटी रुपये.
भांडेवाडी येथे पाच कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हॉट मिक्स प्लांट उभारला जाईल.
पारडी येथे श्री संत तुकाराम महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी ६० लाख रुपये.
मस्कासाथ येथे ५० लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून मटन शॉप.
पारडी येथे प.पू. परमात्मा एक सेवक समाज भवनाचे बांधकाम तसेच दक्षिण नागपुरात संत तुकाराम महाराज यांच्या नावाने समाजभवनाचे बांधकाम करण्यासाठी ५० लाख रुपये.
जुनी शुक्रवारी रोडवर बंद पडलेल्या महापालिकेच्या चिटणीसपुरा प्राथमिक शाळेच्या इमारतीत १ कोटी रुपये खर्चून बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र उभारले जाईल.
सुलभ शौचालय तसेच ई-शौचालयासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद.
दहनघाटांवर नि:शुल्क अंत्यसंस्कारासाठी नि:शुल्क गोवऱ्या उपलब्ध करून देण्यावर विचार.