अंबाझरी आग प्रकरणात विद्यापीठाच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:39+5:302021-02-06T04:11:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानाच्या भाग क्रमांक दोनमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी विद्यापीठाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारावर वनगुन्हा दाखल ...

Ambazari fire case filed against university contractor | अंबाझरी आग प्रकरणात विद्यापीठाच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अंबाझरी आग प्रकरणात विद्यापीठाच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानाच्या भाग क्रमांक दोनमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी विद्यापीठाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचरा जाळण्याच्या कामात दक्षता न घेतल्याने ही आग पसरत अंबाझरीपर्यंत पोहोचली, असा निष्कर्ष वन विभागाच्या पथकाने गुरुवारी केलेल्या चौकशीतून काढला.

बुधवारी दुपारी लागलेल्या आगीमध्ये १०० हेक्टर जंगल जळाले होते. यात सुदैवाने प्राण्यांची हानी झाली नसली तरी, मोठ्या प्रमाणात उंच गवत जळाले. परिणामत: तृणभक्षी प्राणी आणि पक्ष्यांच्या अधिवासावर गंडांतर आले आहे.

गुरुवारी सकाळपासून दिवसभर वन विभागाच्या पथकाने आगग्रस्त परिसराची पाहणी केली. परिसरातील नागरिकांचे जाबजबाब घेतले. यात विद्यापीठाच्या मागील बाजूने आग लागून ती पसरल्याचे निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता, विद्यापीठाने परिसरातील कचरा जाळण्यासाठी कंत्राट दिले होते. त्या कंत्राटदाराची माणसे बुधवारी कचरा जाळत होती. मात्र पुरेशी दक्षता न घेतल्याने आग पसरली व अंबाझरीत पोहोचल्याचे निदर्शनास आल्याचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे गुरुवारी सायंकाळनंतर वनगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रात्री ८ नंतर वनगुन्हा दखल करण्यात आला. उद्या अधिक चौकशीनंतर संबंधित व्यक्तीचे नाव एफआयआरमध्ये दाखल केले जाणार आहे.

...

२० घरटी जळाली

या आगीमध्ये २० घरटी जळाल्याचे पाहणीमध्ये आढळून आले. एनजीओंच्या सहकार्याने वन विभागाने गुरुवारी जळीत वन क्षेत्रात पाहणी केली. यात कोणत्याही प्राण्याचा मृत्यू झाल्याचे आढळले नाही. मात्र पक्ष्यांची घरटी जळालेली आढळली. परिणामत: या घटनेमुळे येथील पक्ष्यांच्या अधिवासावर गंडांतर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

...

Web Title: Ambazari fire case filed against university contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.