आश्चर्यकारक ; ५० मधून १० मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:04+5:302021-06-09T04:10:04+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्यापर्यंत २,८४,०२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात मुलांची संख्या ३०,४२० ...

Amazing; Antibodies increased in 10 out of 50 children | आश्चर्यकारक ; ५० मधून १० मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडी

आश्चर्यकारक ; ५० मधून १० मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडी

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्यापर्यंत २,८४,०२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात मुलांची संख्या ३०,४२० आहे. यावरून कुठलीही लक्षणे नसताना मोठ्या संख्येत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याची शक्यता वर्तविली जात होती. आता मात्र हे वास्तव असल्याचे समोर आले आहे. लहान मुलांवरील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मानवी चाचणीपूर्वी झालेल्या तपासणीत ही आश्चर्यकारक बाब उघड झाली आहे. १२ ते १८ वयोगटातील ५० मधून १० मुलांच्या शरीरात प्रतिपिंडाची (अ‍ॅण्टिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे.

लहान मुलांवरील लसीकरणासाठी राज्यात पहिल्यांदाच नागपुरात बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या पुढाकारात २ ते १८ या वयोगटात कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला ६ मेपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील चाचणीसाठी ५० सुदृढ मुलांची निवड करण्यात आली. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता, १० मुलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून आले. यामुळे डॉक्टरांच्या पथकालाही आश्चर्य वाटले. प्राप्त माहितीनुसार, निवड झालेली मुले सुखवस्तू घरातील आहेत. त्यांच्या घरातील जवळच्या व्यक्तीला संसर्ग झालेला नाही. शिवाय, मागील दोन महिन्यात मुलांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यानंतरही त्यांच्या शरीरात अ‍ॅण्टिबॉडीज वाढल्या आहेत.

- झोपडपट्टीतील लोकांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज

विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या पुढाकाराने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘पीएसएम’ विभागाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० मध्ये सिरो सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील ४९.७ टक्के तर, ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात ‘अ‍ॅण्टिबॉडी’ म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले होते. विशेषत: झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व पॉश वसाहतीत राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट होते.

- मुलांमध्ये वाढलेल्या अ‍ॅण्टिबॉडीजचा अभ्यास होणे महत्त्वाचे

लहान मुलांवरील मानवी चाचणीत ५० मधून १० मुलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून आले आहे. ही एक मोठी संख्या आहे. यामुळे याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. यांना त्यांच्या नातेवाईकांकडून, किंवा इतर मुलांकडून लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. लहान मुलांमधील रोगप्रतिकारकशक्ती मोठ्यांच्या तुलनेत अधिक प्रबळ असते. यामुळे कोरोनाची मध्यम व गंभीर लक्षणे फार कमी प्रमाणात दिसून येतात.

-डॉ. वसंत खळतकर, बालरोग तज्ज्ञ

Web Title: Amazing; Antibodies increased in 10 out of 50 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.