सुरक्षित आहे अमरनाथ यात्रा

By Admin | Updated: July 14, 2015 03:19 IST2015-07-14T03:19:12+5:302015-07-14T03:19:12+5:30

यावर्षी होत असलेल्या अमरनाथ यात्रेवर कुठल्याही प्रकारचा धोका नसून संपूर्ण यात्रा ही सुरक्षित आहे, असा दावा केंद्रीय

Amarnath Yatra is safe | सुरक्षित आहे अमरनाथ यात्रा

सुरक्षित आहे अमरनाथ यात्रा

नागपूर : यावर्षी होत असलेल्या अमरनाथ यात्रेवर कुठल्याही प्रकारचा धोका नसून संपूर्ण यात्रा ही सुरक्षित आहे, असा दावा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स(सीआरपीएफ)चे महानिरीक्षक पंकज कुमार यांनी केला आहे.
पंकज कुमार हे सोमवारी सकाळी सीआरपीएफच्या नागपूर केंद्राची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी चर्चा करीत होते. पंकज कुमार हे सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीर विभागाचे महानिरीक्षक आहेत. सीआरपीएफच्या सुरक्षेतच अमरनाथ यात्रा सुरू आहे. यासंबंधात बोलताना पंकज कुमार यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेवर दीड लाख भक्त आले आहेत. पावसामुळे यात्रेला मध्ये मध्ये थांबविले जाते. भक्तांच्या सुरक्षेत कुठलीही चूक होऊ दिली जात नाही. यात्रेदरम्यान सीमेपलीकडूनही युद्धविरामाचे उल्लंघन झालेले नाही.
पंकज कुमार यांनी जम्मू-काश्मीरच्या दहशतवादावर चर्चा करताना सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत परिस्थिती खूप बदललेली आहे. घुसखोरी मोठ्या प्रमाणावर थांबवण्यात आली आहे. शांततेचे वातावरण निर्माण होत आहे. लोक आता हिंसेवर विश्वास ठेवत नाही. येथील दहशतवाद एक दिवस निश्चित संपेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नक्षलप्रभावित छत्तीसगड, गडचिरोली आणि देशातील इतर भागांमध्ये सीआरपीएफ तैनात करण्याची मागणी वाढत असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, दिवसेंदिवस सीआरपीएफची भूमिका वाढत आहे. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सीआरपीएफ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
याप्रसंगी उपमहानिरीक्षक संजय यादव यांनी सांगितले की, सीआरपीएफच्या सर्व जवानांना घर उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत १३ टक्के लोकांनाच घर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते २५ टक्क्यापर्यंत न्यायचे आहे.
सीआरपीएफच्या देशभरातील ४२ केंद्रांमधून तीन सर्वश्रेष्ठ केंद्रांमध्ये सीआरपीएफ नागपूर केंद्राची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर केंद्राची पाहणी करण्यासाठी महानिरीक्षक पंकज कुमार, उपमहानिरीक्षक जे.एस. संधू व संजय यादव नागपूरला आले होते. त्यांनी उपमहानिरीक्षक ए.के. सिंह आणि समादेशक मनोज ध्यानी यांच्यासोबत केंद्राची पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Amarnath Yatra is safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.