वारीला परवानगी द्या, मंदिरे उघडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:43+5:302021-07-18T04:07:43+5:30
नागपूर : साडेसातशे वर्षांची पायी वारीची परंपरा असलेल्या वारीला परवानगी द्या आणि राज्यातील सर्व मंदिरे उघडा, अशी मागणी करत ...

वारीला परवानगी द्या, मंदिरे उघडा
नागपूर : साडेसातशे वर्षांची पायी वारीची परंपरा असलेल्या वारीला परवानगी द्या आणि राज्यातील सर्व मंदिरे उघडा, अशी मागणी करत शनिवारी विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने नागपुरात प्रतीकात्मक दिंडी आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात सुमारे अडीच तास अभंग गात वारकऱ्यांनी सरकारकडे आपली मागणी नोंदविली. टाळ-मृदंगाच्या गजरात भगव्या पताका झळकवित हे अभिनव आंदोलन केले.
विश्व हिंदू परिषदेसह विश्व वारकरी सेवा संस्था, ज्ञानदेव-तुकाराम प्रतिष्ठान, संत गजानन महाराज समिती, जलाराम सत्संग मंडळ, वैदर्भीय हरिकीर्तन संस्था, अखिल ब्रह्मवृंद संस्था आणि लोकजागृती मोर्चा आदी संस्थांनी आणि संघटनांनी यात सहभाग घेतला होता. दरम्यानच्या काळात विठ्ठलाची पदे आळवीत मृदंग आणि टाळ निनादात वारकऱ्यांनी अभंग गायले. यामुळे एरवी आंदोलनाने गजबजणारा संविधान चौक आज भक्तिरसाने धुंद झाला होता.
सद्गुरूदास महाराज, श्रीरामपंत जोशी, नारायण महाराज शिंदे, भागीरथ महाराज, वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेचे शाम धुमकेकर महाराज, गीता अभ्यास मंडळाचे रमेश महाराज बनकर, विश्व वारकरी सेवा संस्थेचे संदीप महाराज कोहळे, अखिल ब्रह्मवृंद संस्थेचे दिगंबरबुवा नाईक, लोकजागृती मंचाचे रमणजी सेनाड, भगवत गीता अभ्यास मित्रमंडळाचे संजय पंदीलवार आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. वारकरी आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. याप्रसंगी महाराष्ट्र क्षेत्र विहिंपचे विशेष संपर्कप्रमुख अजय निंदलवर, विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री सनत गुप्ता, उपाध्यक्ष हेमंत जांभेकर, प्रांत मंत्री गोविंद शेंडे, नागपूर शहर मंत्री प्रशांत पिपरे, मुकुंदबुवा देवसर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पसायदानाने आंदोलनाची सांगता झाली.
...
आंदोलकांनी लक्ष वेधले
हे आंदोलन लक्षवेधी ठरले. अडीच तास अभंगाचे गायन करून वारकऱ्यांनी प्रशासनाची आळवणी केली. तत्पूर्वी महिलांनी दिंडीतील प्रथेप्रमाणे फुगडी घातली. टाळाच्या आणि मृदंगाच्या ठेक्यावर भक्तिरसात पडणारी त्यांची पावले वारीतील आत्मिक सुखाचा आनंद देणारी ठरली.
...
हवे तर आम्ही रात्री वारी करू
वारीला परवानगी द्या. हवे तर आम्ही रात्री चालू. गावाबाहेर थांबू. लसी घेऊन सहभागी होऊ. मात्र, आमची परंपरा खंडित करू नका, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनातून प्रशासनाकडे केली. दारूची दुकाने आणि व्यापार सुरू करणाऱ्या सरकारला मंदिरांबद्दलच रोष का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
...