मालमत्ता तारण ठेवण्यासाठी अविनाश भुतेंना वेळ मंजूर

By Admin | Updated: August 11, 2016 02:17 IST2016-08-11T02:17:01+5:302016-08-11T02:17:01+5:30

वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी व ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते

Allow time to devastate Avinash to save the property | मालमत्ता तारण ठेवण्यासाठी अविनाश भुतेंना वेळ मंजूर

मालमत्ता तारण ठेवण्यासाठी अविनाश भुतेंना वेळ मंजूर

 नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी व ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांना एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात १५ कोटी रुपयांची मालमत्ता सुरक्षा म्हणून तारण ठेवण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी बुधवारी ही मुदत दिली.
एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाने भुते यांना दर महिन्यात १ कोटी ५० लाख रुपये न्यायालयात जमा करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. यानंतर भुते यांनी २ कोटी रुपये जमा करून या अटीत बदल करण्यासाठी अर्ज सादर केला होता.
दर महिन्यात दीड कोटी रुपये जमा करण्याऐवजी १५ कोटी रुपयांची मालमत्ता सुरक्षा म्हणून तारण ठेवण्यास मंजुरी देण्याची विनंती अर्जात करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने १ जुलै २०१६ रोजी ही विनंती फेटाळून लावली. यामुळे दर महिन्यात दीड कोटी रुपये जमा करण्याची अट पूर्ण न केल्यास विशेष न्यायालयाद्वारे जामीन रद्द करण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी, भुते यांनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे.
उच्च न्यायालयाने दर महिन्यात दीड कोटी रुपये जमा करण्याऐवजी १५ कोटी रुपयांची मालमत्ता सुरक्षा म्हणून तारण ठेवण्यास मंजुरी दिली आहे. भुते यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता, अ‍ॅड. आर. के. तिवारी व अ‍ॅड. आकाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)

Web Title: Allow time to devastate Avinash to save the property