रुग्णाला हाकलून द्यायचे का?
By Admin | Updated: November 14, 2016 02:32 IST2016-11-14T02:32:29+5:302016-11-14T02:32:29+5:30
शासकीय रुग्णालयाला ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याला १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली

रुग्णाला हाकलून द्यायचे का?
खासगी इस्पितळांचा संतप्त सवाल : ५००, १००० नोट स्वीकारण्याला स्थगिती
नागपूर : शासकीय रुग्णालयाला ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याला १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असलीतरी खासगी इस्पितळांना ती नाकारण्यात आली आहे. यामागे बोगस रुग्ण दाखवून काळा पैसा पांढरा होण्याचे कारण सांगितले जात असलेतरी सामान्य रुग्णांचे काय?, ज्यांच्याकडे नव्या नोटा नाहीत, कार्ड नाहीत, त्या रुग्णांना हाकलून द्यायचे काय, असा प्रश्न खासगी इस्पितळांनी उपस्थित केला आहे.
आरोग्य सेवा संचालनालयाने ९ नोव्हेंबर रोजी एक पत्र काढून शासकीयसोबतच खासगी इस्पितळांनी ११ नोव्हेंबरपर्यंत ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याच्या सूचना सर्व खासगी इस्पितळांना दिल्या होत्या. त्यानुसार बहुतांश इस्पितळांनी या नोटा स्वीकारल्या. ही मुदत संपण्याच्या दिवशीच शुक्रवारी शासकीय रुग्णालयांना १४ नोव्हेंबरपर्यंत या नोटा घेण्याच्या नव्या सूचना देण्यात आल्या.
यामुळे खासगी इस्पितळांनीही १२ नोव्हेंबर रोजी या नोटा स्वीकारल्या, परंतु याच दिवशी रात्री उशिरा आरोग्य सेवा संचालनालयाने पत्र काढून ५०० व १००० रुपयाच्या नोटा स्वीकारण्याला स्थगिती दिल्याच्या सूचना दिल्या. यामुळे खासगी रुग्णालयांना आता मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या पत्रात ज्या रुग्णाकडे पैसे नाहीत म्हणून औषधोपचारास नकार देऊ नये, अशी विनंतीही करण्यात आली आहे.