नव्या टाळेबंदीत कोचिंग क्लासेसला परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST2021-03-14T04:07:57+5:302021-03-14T04:07:57+5:30
- असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्सचे महापौरांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पालकमंत्र्यांनी घोषित केलेल्या १५ ते २१ मार्च ...

नव्या टाळेबंदीत कोचिंग क्लासेसला परवानगी द्या
- असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्सचे महापौरांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पालकमंत्र्यांनी घोषित केलेल्या १५ ते २१ मार्च दरम्यानच्या नव्या टाळेबंदीमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोचिंग क्लासेसना नियमांसह परवानगी देण्याची मागणी असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्सने महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या ऑर्डरप्रमाणे टाळेबंदीत कोचिंग क्लासेसना अंशत: परवानगी देण्यात आली आहे. यात शिक्षकांना आपल्या घरूनच ऑनलाईन क्लासेस चालविण्याची मुभा देण्यात आली आहे. जेणेकरून संसर्गाचा वाढता प्रकोप रोखता यावा. असोसिएशन महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत करते. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासविषयक अनेक समस्या असतात आणि त्या सोडविण्यासाठी कोचिंग संस्थांशी व तेथील शिक्षकांशी थेट संवादाची गरज असते. होम कोचिंगमधून या समस्या सोडविण्यात अडचणी येतात. अशा स्थितीत महापालिकेने किमान शिक्षकांना ऑनलाईन कोचिंगसाठी घराऐवजी संस्थेतून परवानगी देण्याची मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. विद्यार्थी घरीच असणार आहेत आणि शिक्षक व कर्मचारी जागरूक असल्याने एकमेकांच्या संपर्कात येण्याची कोणतीही शक्यता नाही. विद्यार्थ्यांचा विचार करत महापौरांनी या टाळेबंदीत कोचिंग क्लासेसना संस्थांतून ऑनलाईन क्लासेसची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष रजनिकांत बोंद्रे यांनी दिले आहे.
-शहरातील अनेक विद्यार्थी राष्ट्रपातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.
-या परीक्षांमध्ये या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे.
-अशा स्थितीत त्यांना व्यवस्थित मार्गदर्शनाची गरज असते.
- संस्थांतून ऑनलाईन शिक्षकांची परवानगी मिळाली तर संसर्ग वाढण्याची मुळीच शक्यता नाही.
................