मतदार पावतीचे वाटप आजपासून
By Admin | Updated: October 3, 2014 02:50 IST2014-10-03T02:50:19+5:302014-10-03T02:50:19+5:30
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार पावती (व्होटर्स स्लीप) वाटपाचे काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

मतदार पावतीचे वाटप आजपासून
नागपूर : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार पावती (व्होटर्स स्लीप) वाटपाचे काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. निवासी संकुल किंवा तत्सम इमारतींमध्ये या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले.
मतदार यादीतील मतदारांचे नाव, त्यांचा क्रमांक, मतदान केंद्र आदींची माहिती असणारी व्होटर्स स्लीप पूर्वी राजकीय पक्षांकडून वाटप केली जात होती. प्रचाराचा एक भाग म्हणून या कामाकडे पाहिले जात होते. त्यावर राजकीय पक्षाचे बोधचिन्ह आणि उमेदवाराचे छायाचित्र राहत असल्याने निवडणूक आयोगाने त्यावर बंदी घातली आणि लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक यंत्रणेकडेच हे काम सोपविले. एका साध्या कागदावर मतदाराचे नाव आणि मतदान केंद्राचे स्थळ असणाऱ्या व्होटर स्लीप वाटपाचे काम शुक्रवारी ३ आॅक्टोबरपासून सुरू होणार असून ते १० आॅक्टोबरपर्यंत चालेल. या काळात मतदान अधिकारी जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघात घरोघरी फिरून व्होटर स्लीपचे वाटप करतील. नागरिकांनी या कामाला सहकार्य करावे. शहरात अनेक निवासी संकुले(अपार्टमेंटस्)आहेत. तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मतदान अधिकाऱ्यांना संकुलात प्रवेश करू द्यावा किंवा बाहेर व्होटर्स स्लीप वाटप करण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सात दिवसांत वाटप करूनही व्होटर्स स्लीप वाटपाचे काम शिल्लक राहिल्यास, ११ आणि १३ आॅक्टोबरला यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. यानंतरही हे काम पूर्ण झाले नाही तर, मतदानाच्या दिवशी म्हणजे १५ आॅक्टोबरला मतदान केंद्रावर यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल, असे कृष्णा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)