राष्ट्रसंतांची विद्यापीठाला ‘अ‍ॅलर्जी’?

By Admin | Updated: July 16, 2015 03:13 IST2015-07-16T03:13:10+5:302015-07-16T03:13:10+5:30

नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव जरी देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यांची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत ...

'Allergy' to the Nationalist Congressional University? | राष्ट्रसंतांची विद्यापीठाला ‘अ‍ॅलर्जी’?

राष्ट्रसंतांची विद्यापीठाला ‘अ‍ॅलर्जी’?

विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रम पोहोचविलाच नाही : प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न शून्यच
लोकमत जागर
नागपूर : नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव जरी देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यांची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात प्रशासनाने वारंवार उदासीनताच दाखविली आहे. तीन वर्षे झाली तरी तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक्रमाचे न ठरलेले शुल्क, नावालाही न झालेला प्रचार-प्रसार अन् सल्लागार मंडळाची एकदाही न झालेली बैठक, या सर्व बाबीतून प्रशासनाला राष्ट्रसंतांच्या विचारांची ‘अ‍ॅलर्जी’च असल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण विद्यापीठात आले होते तेव्हा तत्कालीन कुलगुरू डॉ. श. नू. पठाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी दोन कोटींचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार अध्यासन सुरू झाले. माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी तुकडोजी महाराज विचारधारा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता स्थापन केलेल्या अभ्यास मंडळाने अभ्यासक्रम तयार केला.
सुरुवातीपासूनच तुकडोजी महाराज अध्यासन व विचारधारेला प्रशासनाची उदासीनता व अंतर्गत राजकारणाचा फटका बसला. राज्य शासनाने अध्यासन स्थापनेकरिता २८ आॅक्टोबर २००९ रोजी दोन कोटी रुपयांचा निधी दिला होता. परंतु, त्या निधीचा कसा वापर करावा त्यावर व्यवस्थापन परिषेद मतविभाजन झाल्याने अध्यासन रखडले होते. हा वाद शमल्यानंतरदेखील वारंवार विद्यापीठाने अध्यासनाकडे दुर्लक्षच केले. राष्ट्रसंतांच्या विचारांकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासकीय पातळीवर योजना आखणे आवश्यक होते.
परंतु गेल्या तीन वर्षांत विद्यापीठाला अभ्यासक्रमाचे साधे शुल्कदेखील ठरविता आलेले नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांनादेखील याची माहिती नव्हती व याबाबत आढावा घेण्याची त्यांना गरज वाटली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे इतके दिवस विभागाची जबाबदारी असलेले डॉ.अक्षयकुमार काळे यांनी हा मुद्दा उचलून का धरला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
कुलगुरूंच्या जाहिरातीसाठी कोटी,
राष्ट्रसंतांसाठी दमडीही नाही
नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रियेसाठी कोट्यवधींच्या देयकांचा प्रस्ताव विद्यापीठाने एकमताने संमत केला. लहानसहान गोष्टींसाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च होताना दिसतो, परंतु राष्ट्रसंतांशी संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रसारासाठी दमडीचाही खर्च झालेला नाही. अध्यासनातील एकाही अभ्यासक्रमाची साधी जाहिरात, प्रचार आणि परिपत्रक देखील काढण्यात आलेले नाही. अध्यासनामार्फत फारसे कार्यक्रमही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तीन वर्षांतील प्रथम बैठक आज

राष्ट्रसंतांच्या विचारांवर चालण्याचा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून गेल्या तीन वर्षांत प्रत्यक्षात कुठलाही पुढाकार घेण्यात आला नाही. ‘लोकमत’ने वारंवार हा विषय लावून धरल्यानंतर आता प्रशासनाचे डोळे उघडले असून गेल्या तीन वर्षांत प्रथमच सल्लागार समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. परंतु या बैठकीचा नेमका ‘अजेंडा’ काय राहणार आहे याची माहिती अनेक सदस्यांना देण्यातच आलेली नाही. गेल्या तीन वर्षांत सल्लागार समितीची एकही बैठक बोलविण्याची गरज विद्यापीठाला का वाटली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात अध्यासनाची जबाबदारी असलेले डॉ.अक्षयकुमार काळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: 'Allergy' to the Nationalist Congressional University?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.