सावनेरच्या ‘बीडीओ’वर भ्रष्टाचाराचा आरोप

By Admin | Updated: August 10, 2016 02:40 IST2016-08-10T02:40:27+5:302016-08-10T02:40:27+5:30

सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी माणिक हिमाने यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड

The allegations of corruption on Savner's 'BDO' | सावनेरच्या ‘बीडीओ’वर भ्रष्टाचाराचा आरोप

सावनेरच्या ‘बीडीओ’वर भ्रष्टाचाराचा आरोप

कारवाईची मागणी : बोगस शिक्क्यांचा वापर
खापरखेडा : सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी माणिक हिमाने यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड दाखवून दीड लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी यांनी केला आहे. सदर आरोप सूडबुद्धीने केले जात असल्याची प्रतिक्रिया बीडीओ हिमाने यांनी दिली. किशोर चौधरी यांची पत्नी दहेगाव (रंगारी)च्या सरपंच आहेत.
त्यांच्या कार्यकाळात २०१५ - १६ आणि २०१६ - १७ या आर्थिक वर्षांत दहेगाव (रंगारी) येथे ६०० रोपट्यांची लागवड करण्यात आल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात आले. यासाठी खोटे हजेरीपट व सरपंच आणि सचिवाचे खोटे शिक्के तयार करण्यात आले. या खोट्या हजेरीपट व शिक्क्यांचा वापर करून रकमेची उचल करण्यात आली. सदर हजेरीपट खरे असल्याचे प्रमाणित करण्यात आले. असा प्रकार संपूर्ण सावनेर तालुक्यात सुरू आहे, असा गंभीर आरोप किशोर चौधरी यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे. किशोर चौधरी यांच्या या तक्रारीमुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या संदर्भात खंडविकास अधिकारी माणिक हिमाने यांनी सांगितले की, आपण कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही. दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी ओतकर कार्यरत आहेत. आपण जेव्हाही दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली, तेव्हा ते भेटले नाही. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. (प्रतिनिधी)

 

Web Title: The allegations of corruption on Savner's 'BDO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.