योगेश पांडे नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबाबत अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणारे कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोंढे यांनी तथ्यहीन आरोप करत मुख्यमंत्र्यांची मानहानी केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन दिले.
प्रशांत कोरटकर सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. महिनाभराच्या कालावधीत तो नेमका कुणासोबत होता, त्याला कुणाकुणाची मदत मिळाली, तो कोणत्या वाहनांमधून फिरला, आदी बाबींची चौकशी करण्यात आली. त्याला मदत करणाऱ्यांची माहिती त्याने पोलिसांना दिली. या पाच जणांमध्ये प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिकजत अली, राजू यांची नावे समोर आली आहेत. यातील पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयातील व्यक्ती असून तो कोरटकरसोबत होता असा दावा लोंढे यांनी प्रसारमाध्यमांशी शुक्रवारी बोलताना केला. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने यावर खुलासा करावा अशी मागणीदेखील केली.
पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयातील व्यक्ती नाही याची जाण लोंढे यांना होती. मात्र तरीदेखील त्यांनी जाणुनबुजून आरोप केले व त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुकडे यांनी केली. यावेळी आ. प्रवीण दटके, महामंत्री गुड्डू त्रिवेदी,राम अंबुलकर,श्रीकांत आगलावे,अर्चना डेहनकर प्रामुख्याने उपस्थित होते.