सर्व ‘शेतकरी योजना’ आता महाडीबीटी पोर्टलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:46+5:302021-02-20T04:20:46+5:30

भिवापूर : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी शेतीपयोगी साहित्याच्या विविध योजना राबविल्या जातात. योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळे अर्जही करावे ...

All ‘Shetkari Yojana’ is now on MahaDBT portal | सर्व ‘शेतकरी योजना’ आता महाडीबीटी पोर्टलवर

सर्व ‘शेतकरी योजना’ आता महाडीबीटी पोर्टलवर

भिवापूर : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी शेतीपयोगी साहित्याच्या विविध योजना राबविल्या जातात. योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळे अर्जही करावे लागतात. आता मात्र शासनाने महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शिर्षकांतर्गत विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता एकाच अर्जाव्दारे विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी लॉटरी पध्दत वापरल्या जाणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सुविधेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याने आपल्या नावाची एकदाच नोंदणी करायची आहे. एकाच अर्जाद्वारे त्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे. कृषी विभागाने सदर पोर्टलवर अर्ज करण्यासाठी ११ जानेवारी २०२१ ही अंतिम तारीख घोषित केली होती. त्यानुसार प्राप्त झालेल्या सर्व अर्जांसाठी लॉटरी पध्दत राबविण्यात येत आहे. यामध्ये प्राधान्याने कृषी यांत्रिकीकरण, अनुसूचित जाती/जमातीसाठी नवीन विहिरी, कांदाचाळ, प्लास्टिक मल्चिंग, सुक्ष्म सिंचन आदी योजनांचा समावेश आहे. यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात आले आहे. योजनेअंतर्गत निवड झाल्याचा संदेश ज्या शेतकरी लाभार्थ्यांना प्राप्त झाला आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर पुढील आवश्यक कारवाही करणे आवश्यक आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी दिली.

निवड झाल्यास, हे करा...

महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड झाल्यास अर्जदार शेतकऱ्याने महाडीबीटी संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे ‘शेतकरी योजना’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडीवर क्लिक करावे. वापरकर्ता आयडी व पासवर्ड व त्याखाली प्रतिमेत दाखविलेले शब्द भरून लॉगईन करावे. प्रोफाईल स्थिती पृष्ठावर मुख्य मेनु मधील ‘मी अर्ज केलेल्या बाबी’ या पर्यायावर क्लिक करावे. अप्लाईड घटक मध्ये ‘छाननी अंतर्गत अर्ज’ यावर क्लिक केल्यानंतर आपन केलेल्या सर्व अर्जाची स्थिती दिसेल. त्यामध्ये ज्या घटकासमोर शेरा दिसेल, त्या घटकासाठी आपली निवड झाल्याचे समजावे. त्यानंतर मुख्य मेनु मधील ‘कागदपत्र अपलोड करा’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यात नमुद केलेली विहित कागदपत्रे १५ केबी ते ५०० केबी या आकारमानात अपलोड करून ‘जतन करा’ या पर्यायावर क्लिक करावे.

--

यंदा कृषी विषयक सर्व योजनांचा लाभ हा ‘महाडीबीटी’ पोर्टलद्वारे मिळणार आहे. ही पध्दती संपूर्ण पारदर्शक आहे. यात शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

- राजेश जारोंडे

तालुका कृषी अधिकारी, भिवापूर

Web Title: All ‘Shetkari Yojana’ is now on MahaDBT portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.