राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत सारंग चाफले याची अष्टपैलू कामगिरी

By आनंद डेकाटे | Published: October 12, 2023 02:13 PM2023-10-12T14:13:17+5:302023-10-12T14:15:02+5:30

अष्टपैलू म्हणून आंतरराष्ट्रीय नावलौकीक असलेला सारंग हा महावितरणच्या बुटीबोरी विभागातील निलडोह उपकेंद्र येथे यंत्रचालक म्हणून कार्यरत

All-round performance of Sarang Chafle in National Disability Cricket Tournament | राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत सारंग चाफले याची अष्टपैलू कामगिरी

राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत सारंग चाफले याची अष्टपैलू कामगिरी

नागपूर : राजस्थानच्या उदयपूर शहरात पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय दिव्यांग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा अवघ्या दोन धावांनी पराभव केला असला तरी महावितरणचा कर्मचारी असलेल्या सारंग चाफले याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली.

विदर्भ संघाने आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबाद संघाचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात सारंगने ७ धावा केल्या आणि सोबत २ बळी घेतले. दुसऱ्या सामन्यात विदर्भ संघाने उत्तरप्रदेश संघाचा ३ धावांनी पराभव केला. यात या सामन्यात सारंगने १० धावा केल्या आणि सोबत २ बळी घेतले. चंदीगड विरोधातील तिसरा सामना विदर्भाने ४३ धावांनी जिंकला, यात सारंगने ३९ धावा करीत ४ बळी घेत सामनाविराचा पुरस्कार पटकाविला.

चौथ्या सामन्यात विदर्भ संघाने गुजरातचा ४२ धावांनी पराभव केला, या सामन्यात देखील सारंगने २ बळी घेतले. पाचव्या सामन्यात विदर्भाने उत्तराखंडचा तब्बल ९ गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात दुखापतीमुळे सारंग खेळू शकला नाही. उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात विदर्भाने पंजाब संघावर ५ गड्यांनी विजय मिळविला. या सामन्यात देखील सारंगने अवघ्या १८ चेंडूत ३१ धावा आणि १ बळी घेतला. तर उपांत्य फेरीत मुंबई संघाने विदर्भाचा अवघ्या दोन धावाने पराभव केला मात्र या सामन्यात देखील सारंगने ११ धावा करीत २ बळी सुद्धा घेतले.

सारंग याने दिव्यांग क्रिकेट विश्वात भारताकडून म्हणून भरीव कामगिरी केली असून जन्मतः पोलीओमुळं एक पाय अधु असलेला सारंग क्रिकेटसोबतच शैक्षणिकदृष्ट्याही स्वावलंबी आहे. अष्टपैलू म्हणून आंतरराष्ट्रीय नावलौकीक असलेला सारंग हा महावितरणच्या बुटीबोरी विभागातील निलडोह उपकेंद्र येथे यंत्रचालक म्हणून कार्यरत आहे. त्याने आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर हे स्थान बळकट केले आहे.

Web Title: All-round performance of Sarang Chafle in National Disability Cricket Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.