सर्व उघडले पण बसची संख्या वाढली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:12 IST2021-08-14T04:12:14+5:302021-08-14T04:12:14+5:30
मनपा प्रशासनही टाळतोय स्वत:ची जबाबदारी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर आता बऱ्यापैकी अनलॉक झाले आहे. सर्व काही उघडले ...

सर्व उघडले पण बसची संख्या वाढली नाही
मनपा प्रशासनही टाळतोय स्वत:ची जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर आता बऱ्यापैकी अनलॉक झाले आहे. सर्व काही उघडले आहेत, परंतु शहरातील सार्वजनिक व्यवस्था मात्र आहे तशीच आहे. बसची संख्याही वाढलेली नाही. मनपा प्रशासनही बससेवा तोट्यात असल्याचे सांगत आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. एकूणच नागरिकांना शहर बससेवा योग्यपणे उपलब्ध करून देण्यात सत्तापक्ष पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
कोरोनाचे संकट येण्यापूर्वी शहरात ३६० बस चालत होत्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास ७ महिन्यांपर्यंत बससेवा पूर्णपणे बंद होती. तेव्हापासून बससेवा सुरळीत झालीच नाही. सध्या २०० बस धावत आहेत. फेऱ्या सुद्धा कमी करण्यात आल्या आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत मार्केट सुरु होते. तेव्हा सुद्धा इतक्याच बस व फेऱ्या सुरु होत्या. आता मार्केट रात्री १० वाजेपर्यंत सुरु आहे. सर्व काही उघडले आहे. त्यामुळे बसची संख्याही वाढवण्याची गरज आहे. अनेक मार्गावर बससेवा सुरु करण्याची मागणी होत आहे. परंतु
शहर बससेवा संचलित करणाऱ्या कंपन्या काही ऐकायलाच तयार नाही.
- नागरिक संतापले तर सांभाळणे कठीण होईल
परिवहन सेवा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. तोट्याचा प्रश्नच निर्माण हाेत नाही. आपल्या बसवर खर्च होणाऱ्या एकूण रकमेपैकी ० ते ४५ टक्के रक्कम ही तिकिटांच्या कमाईतून येते. अशा परिस्थितीत बस पूर्णपणे तोट्यात आहे असे म्हणता येणार नाही. घनकचरा व्यवस्थापनातूनही मनपाला कमाई होत नाही. तेव्हा कचरा उचलणेच बंद करावे का? अधिकाऱ्यांनी ही बाब समजून घ्यायला हवी. अन्यथा नागरिक संतापले तर त्यांना सांभाळणे कठीण होईल.
बंटी कुकडे, सभापती, परिवहन समिती मनपा