आई-वडील गेल्याने चारही मुलींचा गेला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:55+5:302021-05-25T04:08:55+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर पहाडी भागात वसलेले रामपुरी हे एक छोटेसे गाव. येथील विनायक उईके (५२) यांचा ...

आई-वडील गेल्याने चारही मुलींचा गेला आधार
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर पहाडी भागात वसलेले रामपुरी हे एक छोटेसे गाव. येथील विनायक उईके (५२) यांचा शुक्रवारी अल्पशा आजाराने मृत्यू झाला. उईके यांना चार मुली असून पत्नी रेखाचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. तेव्हापासून विनायक मोलमजुरी व शेती करून मुलींचा सांभाळ करत होते. परंतु, नियतीला ते मान्य नव्हते. शुक्रवारी अल्पशा आजाराने त्यांचेसुद्धा निधन झाले. वडिलांच्या अचानक जाण्याने मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन वर्षांपूर्वी आई गेल्याने वडिलांचा त्यांना आधार होता. ते दु:ख विसरत नाही तर वडिलांचे निधन झाले. चारही मुली वडिलांना कामाला हातभार लावत शिक्षण घेत होत्या. वडील गेल्याने मुलींचे काय होईल? त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गत वर्षभरापासून कोरोनामुळे सामान्य व्यक्तीची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. हाताला काम नाही. अशा कठीण काळात वडील गेल्याने मुलींवर मोठी बिकट परिस्थिती ओढवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांनी त्या मुलींचे घर गाठले. त्यांना धीर दिला. इतकेच नव्हे तर त्या मुलींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्या मुलींचा शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे उमरकर यांनी सांगितले. उमरकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्या मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतील. आपल्या पायावर उभ्या राहतील. अशी मदत समाजाने अडचणीत सापडलेल्यांना करण्याची गरज आहे. सरपंच गौतम इंगळे, उपसरपंच संदीप कोहळे, श्रावणजी बागडे, हेमराज चौधरी, तलाठी वाहने, सचिव गिरीपुंजे व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
मोठ्या मुलीवर आली परिवाराची जबाबदारी
रामपुरी येथील विनायक उईके यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दोन वर्षांपूर्वी आई आणि आता वडील गेल्याने या चारही मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला. परंतु, घरातील मोठी व्यक्ती म्हणून शीतल उईके हिच्यावर परिवार सांभाळण्याची जबाबदारी वयाच्या २२ व्या वर्षी आली आहे. तिला तीन बहिणींचा सांभाळ करून संसाराचा गाडा चालवायचा आहे. इतक्या कमी वयात तिच्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. तीन बहिणींचा सांभाळ करताना तिला स्वत:चे शिक्षणसुद्धा पूर्ण करायचे आहे.