नागपूर : गेल्या दहा-बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी नागपुरात अचानक जाेरदार हजेरी लावली. या हजेरीसह १३ पासून वर्तविलेल्या धुवांधार अंदाजाचे संकेतही दिले आहेत. हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत काही ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जाेरदार पावसाची शक्यता वर्तवलेली असून येलाे अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. आकाशातून ढगांची गर्दीही हटली हाेती व सूर्याची तीव्रता वाढली हाेती. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून नागरिकांना ऐन श्रावणात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान १० तारखेपासून गडचिराेली, चंद्रपूर, गाेंदिया व भंडारा जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. इतर जिल्ह्यात मात्र काेरड पडली हाेती. नागपूरही पावसाच्या गारव्यापासून वंचित हाेते. जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक असलेला पाऊस दहा-बारा दिवसाच्या खंडामुळे सरासरीच्या खाली गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली हाेती.
मंगळवारीही तीच अवस्था हाेती. दरम्यान हवामान विभागाने मात्र १२ पासून पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. सकाळपासून दुपारपर्यंत आकाश निरभ्र हाेते. दुपारनंतर मात्र आकाश ढगांनी व्यापले आणि ३.३० वाजता दरम्यान संथपणे सुरू झालेला पाऊस तीव्रतेने बरसला. मात्र शहरात ही हजेरी असमान हाेती. मेडिकल ते सीताबर्डीपर्यंत धुवांधार बरसत असताना गाेपालनगर परिसरात शुकशुकाट हाेता. शहरात सायंकाळपर्यंत ९ मि.मी. पावसाची नाेंद झाली. आर्द्रता मात्र ९५ टक्क्यावर पाेहचल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूरला १४ मि.मी. पाऊस झाला, तर भंडारा जिल्ह्यात किरकाेळ हजेरी लावली.
नागरिकांनी सतर्क रहावे
१३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसाकरीता नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळीवारा तसेच विज गर्जना व एक ते दोन ठिकासणी मुसळधार पाऊसाचा इशारा दिलेला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विज गर्जना होत असताना शक्यतो घरातच रहावे, मोबाईल फोन बाळगू नये, घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी, पाऊस व विजा होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, तसेच नदी, नाले, दुथळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, ही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.