नागपुरात ‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 10:40 AM2019-06-07T10:40:24+5:302019-06-07T10:42:50+5:30

केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा रुग्ण नुकताच आढळून आला आहे. यातच विविध जिल्ह्यातील ३११ संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

'Alert' in front of 'Nipah' in Nagpur | नागपुरात ‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर ‘अलर्ट’

नागपुरात ‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर ‘अलर्ट’

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाने दिले खबरदारीचे आदेश केरळमधून आलेल्यांनी तपासणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा रुग्ण नुकताच आढळून आला आहे. यातच विविध जिल्ह्यातील ३११ संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र आरोग्य सेवा संचालनालयाने या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या खबरदारीचे आदेश दिले आहेत. नागपुरात शासकीयसह खासगी रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने या रोगाची माहिती, लक्षणे, निदान व प्रतिबंधात्मक खबरदारीचे पत्रक सर्व उपसंचालक कार्यालयांना पाठविले आहे.
निपाह मेंदुज्वराचे रुग्ण पहिल्यांदा १९९८ मध्ये क्वालालम्पूरजवळील निपाह या गावी दिसून आले. नंतर हा रोग इतर गावात आणि सिंगापूरलाही पसरला. नंतर तो डुकराचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. त्यावेळी २६५ रुग्णांची नोंद झाली होती. यातील १०४ रुग्ण बळी पडले होते. २००१ मध्ये सिलिगुडी येथे ६६ रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या वर्षी म्हणजे, १७ मे २०१८ रोजी केरळ येथील २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसºयाच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदुज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्युमुखी पडले होते. आता पुन्हा ३० मे रोजी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला या रोगाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली. सोबतच विविध जिल्ह्यातील ३११ संशयित रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्राला या रोगापासून फारसा धोका नसला तरी खबरदारी म्हणून निपाहसदृश आजाराचे (मेंदुज्वर) सर्वेक्षण सर्व स्तरावर करणे, प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी दिले आहेत. या संदर्भातील एक पत्र राज्यातील सर्व उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविण्यात आले आहेत.

असा होतो निपाह विषाणूचा प्रसार
निपाह विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांच्या मार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने किंवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीवर प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. या विषाणूची लागण माणसांपासून माणसांना होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांनाही लागण होण्याचा धोका असतो. हा रोग अतिशय लागट आहे. या रोगाचा विषाणुबाधित ताडी प्याल्यामुळेसुद्धा माणसामध्ये संसर्ग होतो. जागतिक टॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले, रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. या भयंकर रोगाकरिता औषध नाही आणि प्रतिबंधक लसदेखील नाही. रोग कमी प्रमाणात दिसतो. परंतु घातक आहे. कारण, लक्षणे दिसताच सात दिवसांत रुग्ण दगावण्याची शक्यता असते. औषधी नसल्यामुळे या रोगापासून बचाव करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

संशयित रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवा
ताप, डोकेदुखी, झोपाळलेपण, मानसिक गोंधळ उडणे, शुद्ध हरपणे ही निपाह रोगाची लक्षणे आहेत. आरोग्य विभागाने अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना, जपानी मेंदूज्वर असलेल्या किंवा निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना, याशिवाय गेल्या तीन आठवड्यात केरळमध्ये विशेषत: एर्नाकुलम परिसरात, ईशान्य भारतात किंवा बंगाल देश किंवा सीमेलगतच्या भागात प्रवास केलेल्यांना किंवा इतिहास असलेल्यांमध्ये लक्षणे दिसताच संशयित रुग्ण म्हणून गृहित धरावे. रुग्णास स्वतंत्र कक्षात भरती करावे. रुग्णाचे नमुने ‘एनआयव्ही’ पुणे येथे पाठवावे, अशा सूचनाही आरोग्य विभागाने केल्या आहेत.

केरळ येथून आलेल्यांनी खबरदारी म्हणून डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी. निपाह रोगाची मिळतीजुळती लक्षणे दिसताच आरोग्य विभागाशी संपर्क साधायला हवा. सध्या तरी राज्यात या आजाराच्या रुग्णाची नोंद नाही. परंतु लोकांनी भीती न बाळगता जागरूक राहणे आवश्यक आहे. निपाह विषाणूविषयी आरोग्य सेवा संचालकांनी मार्गदर्शक तत्त्वे पाठविली आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांना याविषयी ‘अलर्ट’ करण्यात आले आहे.
-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर मंडळ

Web Title: 'Alert' in front of 'Nipah' in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य