मद्यपींचा सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:58+5:302021-03-14T04:09:58+5:30
- न्यू लोकमत कॉलनीतील घटना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्यरात्री दारू पित बसलेल्या मद्यपींनी न्यू लोकमत कॉलनीतील सुरक्षा ...

मद्यपींचा सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांवर हल्ला
- न्यू लोकमत कॉलनीतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यरात्री दारू पित बसलेल्या मद्यपींनी न्यू लोकमत कॉलनीतील सुरक्षा रक्षकांसह मध्यस्थी करण्यात आलेल्या कॉलनीतील नागरिकांवर लाठीहल्ला केला. या हल्ल्यात कॉलनीतील श्याम कटरे, सुरक्षा रक्षक हरिभाऊ राजूरकर आणि त्यांचे दोन साथीदार जखमी झाले आहेत. अरविंद भोयर यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.
घटनेची सूचना मिळताच बुटीबोरी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. तोवर आरोपी आपली स्कूटी क्रमांक एमएच ४०/ बीएन ९८७९ घटनास्थळावरच सोडून पसार झाले होते. पोलिसांनी त्यांचा दूरवर पाठलाग केला. मात्र, ते हाती लागले नाहीत. स्कूटीजवळ एक आधारकार्ड आढळले. त्या आधारावर पोलिसांनी लागलीच तुरकमारी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या प्रकरणात चार आरोपींना अटक केल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणात सहभागी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसापासून या परिसरात गुन्हेगारांचे वर्चस्व वाढत आहे. संधी साधताच गुन्हेगार कॉलनीमधील सुनसान भागातील घरांना टार्गेट करत आहेत. या भागात गुन्हेगार सातत्याने दारू ढोसत असल्याचे दिसून येते. त्यांना हटकले असता गुन्हेगार नागरिकांना धमकावत असतात.
..............